विधानसभेतील ३५ लक्षवेधी चर्चांवरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या कामकाजावर ताशेरे ओढले. विधेयकांवर काम करण्याऐवजी लक्षवेधी चर्चांवर भर दिला जात असल्याचा आरोप करत, त्यांनी विधानभवनाला ‘लक्षवेधी भवन’ असे नावच देऊन टाकले.
माथाडी कामगार विधेयकावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, कामगार कायद्यात बदल करत असताना कामगारांना संरक्षण दिले जाते, मग आमदारांचे काय? विधानसभेतील कामकाज नियमांप्रमाणे चालत नाही. इथे विधेयकांपेक्षा लक्षवेधी चर्चांना जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे आता हे विधानभवन नव्हे, तर ‘लक्षवेधी भवन’ झाले आहे.
मुनगंटीवार यांनी ११ अशासकीय विधेयके सादर केली होती, मात्र दिवसभराच्या कामकाजात ३५ लक्षवेधींसह इतर कामांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे त्यांची विधेयके चर्चेला आलीच नाहीत. त्यामुळे संतापलेल्या मुनगंटीवार यांनी सभागृहातील कामकाजाच्या पद्धतीवर जोरदार टीका केली.
विधानसभेत महत्त्वाची विधेयके चर्चेत येत नाहीत, पण लक्षवेधी चर्चांसाठी वेळ दिला जातो, असा आरोप करत मुनगंटीवार यांनी घणाघाती हल्ला केला . विधिमंडळ अधिवेशनात नियमांचा भंग होत असल्याची टीका करत, विधानसभेच्या सद्यस्थितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Leave a Reply