कुणाल कामराच्या शोमुळे वादंग! हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्यावरून पेटलेला राजकीय वाद आता अधिक तीव्र झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड केल्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तत्काळ कारवाई करत स्टुडिओतील अनधिकृत बांधकाम पाडले आहे.

कुणाल कामराने आपल्या शोमध्ये ‘भोली सी सूरत, आँखों में मस्ती…’ या गाण्याच्या चालीवर शिवसेनेतील फूट आणि शिंदे गटावर टीका करणारे व्यंगात्मक गीत सादर केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, शिंदे गटाच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रविवारी रात्री संतप्त कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओवर धडक मारत तोडफोडीचा प्रकार घडवून आणला.

या घटनेनंतर सोमवारी सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी स्टुडिओची पाहणी केली. तपासादरम्यान, तेथे अनधिकृत बांधकाम आढळून आले. यानंतर दुपारच्या सत्रात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत संबंधित भाग पाडला.

कुणाल कामराने आपल्या शोमध्ये महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ, शिवसेनेतील फूट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी यावर व्यंगात्मक टिप्पणी केली होती. विशेषतः, शिंदे गटाच्या गुवाहाटी दौर्‍यावर केलेल्या टोलेबाज टिप्पणीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली.

या संपूर्ण प्रकारावर शिंदे गट आक्रमक भूमिकेत दिसत असला, तरी उद्धव ठाकरे गटाने कामराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवला आहे. हॅबिटॅट स्टुडिओवरील हल्ला, त्यानंतर झालेली बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई आणि वाढत्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *