रायगडावरील ऐतिहासिक वाघ्या कुत्र्याच्या पुतळा हटवण्याची मागणी माजी खासदार आणि रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या मागणीला धनगर समाजाने तीव्र विरोध दर्शवत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी या मागणीवर आक्षेप घेत, “वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल, तर गाठ आमच्याशी आहे!” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी ३१ मे २०२५ पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब दोडतले यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका करत, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हटवू दिला जाणार नाही,” असे ठणकावले. धनगर समाजानेही यावर आक्रमक भूमिका घेतली असून, संभाजीराजे महाराष्ट्रात असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. “जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हात लावला गेला, तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रायगडाकडे कूच करेल,” असा इशाराही देण्यात आला आहे. धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी हा वाद मुद्दामहून उकरून काढल्याचा आरोप केला आहे. “होळकर घराण्याने वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, म्हणूनच आता हा विषय मुद्दाम उचलला जात आहे का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी विचारले, “राज्यात जातीय तेढ निर्माण करायची आहे का? अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशीच ही मागणी करण्यामागचे नेमके कारण काय?” ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही संभाजीराजेंच्या भूमिकेवर टीका करत, “संभाजीराजे जातीय तेढ निर्माण करत असून, त्यांना रायगड प्राधिकरण समितीवरून हटवले पाहिजे,” अशी मागणी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. त्यामुळे ती रायगडावरून हटवलीच पाहिजे.” या संपूर्ण वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. रायगडाच्या ऐतिहासिक वारशावरून निर्माण झालेल्या या नव्या संघर्षावर राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply