छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले ऐतिहासिक किल्ले अधिक प्रभावीपणे जतन, देखभाल आणि संवर्धन करण्यासाठी हे किल्ले महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत द्यावेत, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सध्या महाराष्ट्रातील ५४ किल्ले केंद्र सरकारच्या संरक्षणाखाली तर ६२ किल्ले राज्य संरक्षित आहेत. या किल्ल्यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे किल्ले राज्य सरकारच्या ताब्यात दिल्यास त्यांचे संरक्षण अधिक प्रभावीरीत्या करता येईल, असे ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी किल्ल्यांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या माध्यमातून अनुभवी तज्ज्ञ, वास्तुविशारद आणि संवर्धन क्षेत्रातील कुशल कंत्राटदार उपलब्ध आहेत. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष उपक्रम राबवत असून, खासगी संस्थांच्या सीएसआर निधीतूनही सहकार्य मिळू शकते.
“छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान ठेवून हे ऐतिहासिक किल्ले महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने लवकरात लवकर सुरू करावी,” अशी मागणी ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
Leave a Reply