संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याशी अजित पवार असहमत; म्हणाले..

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचाराला पुढे नेले. मात्र, आपल्या प्राध्यापक आणि शिक्षकांकडून चुकीचा इतिहास मांडला जात आहे,”असे भिडे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संभाजी भिडे यांना जे वाटतं ते ते बोलू शकतात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा समावेश होता. शिवाजी महाराज हे आदर्श आणि रयतेचे राजा होते. त्यांचं नेतृत्व जगाने मान्य केलं आहे.

संभाजी भिडे नेमके काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, असं संभाजी भिडे यांनी केलं आहे.

सध्या छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून ‘बलिदान मास’ पाळला जात आहे. याच अनुषंगाने शनिवारी सकाळी सकाळी साडेसात वाजता सांगलीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मूक पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहितीही भिडे गुरुजींनी दिली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *