गुजरात सरकार केवळ महाराष्ट्रातील उद्योगधंदेच पळवत नाही, तर परीक्षाही तिकडे नेत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या (फॉरेन्सिक लॅब) कंत्राटी पदांसाठी ५ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे. मात्र, ही परीक्षा महाराष्ट्रात न होता थेट गुजरातच्या गांधीनगर येथे घेतली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांना मोठा आर्थिक आणि प्रवासाचा फटका बसणार आहे.
१७ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील फॉरेन्सिक लॅबमधील वैज्ञानिक सहायक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. परीक्षेचे कंत्राट गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला देण्यात आले असून, या अंतर्गत १६६ पदांसाठी ५ आणि ७ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतानाही येथे एकही परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी थेट गुजरातला जाण्यासाठी रेल्वेचीही सोय नाही. त्यामुळे अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत. उमेदवारांनी मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र मंजूर करण्याची मागणी केली आहे.
यावर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मराठीच्या व्यापक हितासाठी या संघटनेचे प्रमुख संयोजक, यांनी रोष व्यक्त केला आहे “महाराष्ट्र शासनाच्या पदांसाठी परीक्षा केंद्रे महाराष्ट्रात असायला हवीत, ती गुजरातला का ठेवली गेली? महाराष्ट्रात परीक्षा घेणारे सगळे गेले कुठे? कोणाचे हे डोके आहे? , मराठीचे हित गुजरात बघणार का महाराष्ट्र? हे सगळेच अनाकलनीय आहे, असं ते म्हणाले.
Leave a Reply