ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यावतीने 6 एप्रिल रोजी ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि स्तंभलेखक आणि महाराष्ट्र टाईम्सचे सल्लागार संपादक श्रीकांत बोजेवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दूरचित्रवाणी वरील “हास्य जत्रा” या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक व लेखक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे हे दोघे वरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.रविवारी सायंकाळी 5.30 वाजता ठाण्यातील सरस्वती मंदिर वा.अ रेगे सभागृहात सत्काराचा कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे.
ठाण्यातील अग्रणी स्थानिक ‘दैनिक ठाणे वैभव’ या वर्तमानपत्राला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपादक मिलिंद बल्लाळ यांचा तसेच गेली २५ वर्षे वर्तमानपत्रातून ‘तंबी दुराई’ या नावाने स्तंभ लेखनातून वाचकांना आनंद देणारे पत्रकार व महाराष्ट्र टाईम्सचे सल्लागार संपादक श्रीकांत बोजेवार या दोघांचाही जाहीर सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे.
मिलिंद बल्लाळ यांचा परिचय
गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मिलिंद बल्लाळ कार्यरत आहेत. १८ वर्ष टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे मिलिंद बल्लाळ सध्या “ठाणे वैभव” या वृत्तपत्राचे संपादक आहेत. अमराठी ठाणेकरांना आपल्या ठाण्या विषयीच्या घडामोडी समजाव्यात म्हणून त्यांनी Know Your Town हे साप्ताहिक सुरु केलं.मिलिंद बल्लाळ हे पत्रकारिते व्यतिरिक्त समाजकार्य, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ही कार्यरत आहेत. प्रवासी महासंघाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहतायत. रोटरी क्लब, तसेच विधायक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग असतो.आजवरच्या कारकीर्दीत त्यांना “बाळशास्त्री जांभेकर” पुरस्कार रावसाहेब गोगटे पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे
श्रीकांत बोजेवार यांचा परिचय
श्रीकांत बोजेवार हे तिरकस राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लिखाणासाठी तसेच चित्रपटविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत. सकाळ, लोकसत्ता आणि आता महाराष्ट्र टाइम्स असा पत्रकारितेचा २८ वर्षांचा प्रवास. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे सल्लागार संपादक. चित्रपट समीक्षक तसेच रविवार पुरवणीचा समन्वयक म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर ‘तंबी दुराई’ या नावाने १२ वर्षे लिहिलं, आणि ते सर्वदूर लोकप्रिय झालं आहे.
त्याचे तीन खंड पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले व त्यांना ‘राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट विनोदी लेखना’चे दोन पुरस्कार मिळाले. पुढे ‘तंबी दुराई’ याच नावाने ‘दीड दमडी’ हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये १३ वर्षे लिहिलं. ‘पावणे दोन पायाचा माणूस’ ही कादंबरी प्रकाशित. पद्मगंधा, ऋतुरंग, आवाज, रूची, जत्रा अशा अनेक दिवाळी अंकांमध्ये सातत्याने लेखन केलं आहे. ‘एक हजाराची नोट’, ‘ब्रेव्हहार्ट’, ‘लोणावळा बायपास’. ‘माझी आई’ या आणि इतर चित्रपटांचे पटकथा-संवाद, गीत लेखन. ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘बंड्याचा फंडा’ इत्यादी मालिकांसाठी लेखन केलं आहे.
Leave a Reply