पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज – संघाचे आदर्श : मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आधुनिक युगातील संघाचे प्रेरणास्रोत आणि आदर्श म्हणून गौरवले. नागपुरात आयोजित ‘युगंधर शिवराय – नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. मोहन भागवत म्हणाले, “संघ हे तत्वनिष्ठ कार्यसंघटन आहे, जे व्यक्तिनिष्ठतेला महत्त्व देत नाही. मात्र, जीवनात एक आदर्श असणे आवश्यक आहे. प्राचीन काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे आदर्श शोधणे कठीण आहे.”

 

भागवत पुढे म्हणाले, “इस्लामिक आक्रमणामुळे भारत उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने आणि पराक्रमाने देशाला नव्या दिशेने नेले. त्यामुळेच संघाच्या पहिल्या तीन सरसंघचालकांनीही विविध कालखंडांत शिवाजी महाराज हेच प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले आहे.” छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य परकीय सत्तांविरोधात कठोर संघर्ष करत स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आग्र्याच्या कैदेतून सुटका शक्य होईल का, याबाबत अनेकांना शंका होती. मात्र, महाराज धाडसाने त्यातून बाहेर पडले आणि पुन्हा आपल्या स्वराज्याला बळकटी दिली. त्यांच्या या धाडसाने भारतात परकीय सत्तेच्या वर्चस्वाला रोख बसला आणि बुंदेलखंड, राजस्थान तसेच मुघलांच्या तावडीत अडकलेल्या प्रदेशांची मुक्तता झाली. “शिवाजी महाराजांनी भारताच्या सातत्याने होणाऱ्या पराभवांच्या मालिकेला पूर्णविराम दिला. आज अडीचशे वर्षांनंतरही तेच आपले प्रेरणास्रोत आणि आदर्श राहिले आहेत,” असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *