अंदमान आणि निकोबार बेटांवरील प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. मायखाइलो विक्टोरविच पॉलिकोव्ह (२४) असे या संशयिताचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्याकडील ‘गोप्रो’ कॅमेरा जप्त केला असून, त्यातील व्हिडिओंमधून त्याने उत्तर सेंटिनेल बेटाला भेट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशीत पॉलिकोव्हने स्वतःला ‘थ्रिल सीकर’ (थरार शोधणारा) असल्याचे सांगितले. त्याने यापूर्वी अफगाणिस्तानात तालिबान सदस्यांना भेट दिल्याचा दावाही केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॉलिकोव्हने सेंटिनेल बेटावर अनेक वेळा जाण्याचा प्रयत्न केला होता.
पहिल्यांदा, तो १८ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतात आला आणि फुगवता येणाऱ्या बोटीच्या मदतीने उत्तर सेंटिनेल बेटाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. त्यानंतर १८ जानेवारी रोजी, त्याने आपल्या बोटीला बाह्य मोटर बसवण्याचा प्रयत्न केला आणि बारातांग बेटांवर जाऊन, जरावा जमातीचे चित्रीकरण केले. २७ जानेवारी रोजी तो भारतातून निघून गेला. तिसऱ्या प्रयत्नात, २६ मार्च रोजी तो पुन्हा पोर्ट ब्लेअर येथे परतला. यावेळी, त्याने फुगवता येणारी बोट आणि सुझुकी आउटबोर्ड मोटर सोबत आणली. स्थानिक कार्यशाळेत मोटर बसवून, इंधन खरेदी करून २७ मार्च रोजी एका रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. कुर्मा डेरा बीचवर जाऊन समुद्राच्या भरती-ओहोटीचा अभ्यास केला आणि बेटाच्या प्रवेशाबाबत निरीक्षण केले.
२९ मार्च रोजी पहाटे १ वाजता, पॉलिकोव्ह कुर्मा डेरा बीचवरून आपल्या बोटीतून निघाला. त्याने सेंटिनेल लोकांसाठी नारळ आणि डाएट कोकचे कॅन सोबत घेतले होते. सकाळी १० वाजता तो उत्तर सेंटिनेल बेटाच्या ईशान्य किनाऱ्यावर पोहोचला. दुर्बिणीच्या मदतीने परिसर पाहिला, मात्र कोणतेही स्थानिक रहिवासी त्याला दिसले नाहीत. एफआयआरनुसार, काही वेळ किनाऱ्यावर थांबून त्याने नारळ आणि कोक नैवेद्य म्हणून ठेवले, वाळूचे नमुने गोळा केले आणि आपल्या बोटीवर परतण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला. तब्बल एक तास समुद्रकिनारी थांबून तो शिट्टी वाजवत राहिला, मात्र सेंटिनेलीजकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी १ वाजता तो परतीच्या प्रवासाला निघाला आणि संध्याकाळी ७ वाजता कुर्मा डेरा बीचवर परतला. या घटनेची माहिती अमेरिकन दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार प्रशासनाने सेंटिनेलीज जमातीच्या संरक्षणासाठी कठोर धोरणे आखली आहेत.
२०१८ मध्ये, अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाऊ यांनी या जमातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सेंटिनेल लोकांनी त्यांची हत्या केली होती. त्यामुळे या बेटांवर बाह्य व्यक्तींना प्रवेश करण्यास कायद्याने संपूर्णतः मनाई आहे
Leave a Reply