कार्मायकल रोडवर अदानी समूहाची भव्य खरेदी : १७० कोटींना वृक्षाच्छादित भूखंड विकत

दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्मायकल रोडवरील एक एकरहून अधिक क्षेत्रफळ असलेला वृक्षाच्छादित भूखंड अदानी समूहाच्या ‘माह-हिल प्रॉपर्टीज’ या उपकंपनीने तब्बल १७० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. पारशी कुटुंबाच्या मालकीतील या भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार रिअल इस्टेट क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी करार ठरत आहे.

रिअल इस्टेट विश्लेषण संस्था ‘सीआरई मॅट्रिक्स’ने मिळवलेल्या दस्तऐवजांनुसार, बेहराम नौरोसजी गमाडिया यांनी वारसा हक्काने मिळालेला सुमारे ४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ‘माह-हिल प्रॉपर्टीज’कडे हस्तांतरित केला. हा व्यवहार २७ मार्च २०२५ रोजी अधिकृतरित्या नोंदवण्यात आला असून, खरेदीदार कंपनीने १०.५ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरली आहे. ‘माह-हिल प्रॉपर्टीज’च्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर करण्यात आलेल्या या करारात कंपनीचा पत्ता अदानी समूहाच्या अहमदाबाद येथील मुख्यालयाचा असल्याचे नमूद आहे. या भूखंडाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. १९२७ मध्ये जहांगीर नौरोसजी गमाडिया यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी पुतलीबाई आणि मुलं नौरोजी जहांगीर गमाडिया व बाई मानेकबाई यांना उत्तराधिकारी म्हणून जमिनीचा हक्क मिळाला. पुढे, पुतलीबाई, जहांगीर होरमासजी कामा आणि बेहरामजी नौरोजी गमाडिया यांना जमिनीचे प्रशासकीय हक्क बहाल करण्यात आले.

 

१९४३ मध्ये या भूखंडाचे मालकी हक्क संयुक्त स्वरूपात वाटले गेले. त्यानंतर, १९७४ मध्ये सम्राटमल सेठ यांच्याशी विकासासाठी करार करण्यात आला. काही वर्षांनी या करारावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर, पारस्परिक समझोत्याने बेहराम गमाडिया यांना १४० कोटी रुपये आणि सेठ कुटुंबाला ३० कोटी रुपये अदा करण्यात आले.

 

२०३४ साठीच्या विकास आराखड्यानुसार हा भूखंड निवासी वापरासाठी आरक्षित आहे. मात्र, १९९१ च्या आराखड्यानुसार तो बाल उद्यानासाठी राखीव हिरवळीचा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता. नंतर महापालिकेने हा प्रस्ताव मागे घेत राज्य सरकारकडे भूखंडाला बाग किंवा हरित पट्टा घोषित करण्याचा प्रस्ताव सादर केला, परंतु राज्य सरकारने तो प्रस्ताव फेटाळला आणि भूखंडाचा वापर निवासी म्हणून कायम ठेवण्यात आला. हा भूखंड महापालिका आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानाच्या अगदी शेजारी, म्हणजेच एम. एल. डहाणूकर मार्गावर (माजी नाव – कार्मायकल रोड) स्थित आहे. विकास आराखड्यात या भूखंडाच्या एका भागातील हिरवा उतार कायम ठेवण्यात आला असला तरी उर्वरित क्षेत्र रहिवासी वापरासाठी दर्शवण्यात आले आहे. या व्यवहारामुळे अदानी समूहाने मुंबईच्या अल्ट्रा-हायएंड रिअल इस्टेट क्षेत्रात आपली उपस्थिती अधिक ठामपणे नोंदवली आहे. इतक्या मोठ्या आर्थिक मूल्याचा भूखंड खरेदी केल्याने, समूह लवकरच या ठिकाणी भव्य निवासी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *