अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ९९वे पर्व कोणत्या शहरात रंगेल, याकडे साहित्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे. यंदा इचलकरंजी, औदुंबर, शाहूपुरी (सातारा) आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील चार स्थळांनी संमेलनासाठी निमंत्रण दिले असून, त्यामुळे संमेलन पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. ३१ मार्चपर्यंत अखिल भारतीय साहित्य महामंडळाला या चारही शहरांकडून अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. संमेलनाच्या स्थळाची निवड करण्यासाठी महामंडळाची महत्त्वाची बैठक १० एप्रिल रोजी पुण्यात होणार आहे. या बैठकीत स्थळ निवड समिती गठित केली जाणार असून, समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
कोण म्हणतं साहित्याची ठिणगी विझली?
औदुंबरकडून सदानंद साहित्य मंडळ, कोल्हापुरातून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, साताऱ्यातून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा व मावळा फाउंडेशन, तर इचलकरंजीकडून मसापची शाखा पुढे सरसावली आहे.
साताऱ्याचे स्वप्न पुन्हा साकार?
साताऱ्यात ३२ वर्षांपूर्वी संमेलन झाले होते. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही संमेलनाच्या आयोजनाची मागणी करत आहोत. १०० व्या साहित्य संमेलनाच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा साताऱ्याला संमेलनाचा मान मिळावा, असे मत नंदकुमार सावंत (अध्यक्ष, मसाप शाखा शाहूपुरी) यांनी व्यक्त केले.
कोल्हापूरला ६५ वे साहित्य संमेलन झाले होते, त्यानंतर बराच काळ उलटून गेला. यंदा राजर्षी शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी अर्थात १५०वे जयंती वर्ष आहे. यानिमित्त कोल्हापूरला संमेलन होणे, हे औचित्यपूर्ण ठरेल.” – डॉ. विनोद कांबळे, कार्यवाह.
Leave a Reply