राज्यात ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसारावर अंकुश ठेवण्यासाठी कर्नाटक सरकार लवकरच नव्या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी बुधवारी दिली. मंड्या जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांची स्थिती, पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता व बेकायदेशीर कृतींवर घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. गृहमंत्री परमेश्वरा यांनी स्पष्ट केले की, “के.आर. पेट, बसरालू व कोप्पा परिसरांमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी व बेटिंगच्या रॅकेट्सबाबत तक्रारी वाढत आहेत. या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली असून, पोलिसांनी स्थानिक पातळीवर गस्तीद्वारे माहिती संकलन करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” गृहमंत्र्यांनी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या प्रकारांकडे लक्ष वेधताना सांगितले की, “काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची या गुन्हेगारी कृत्यांतील सहभागाची माहिती समोर आली आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कोणतीही सहानुभूती न ठेवता कठोर कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.”
अनुसूचित जाती व जमातीवरील अन्यायासंदर्भात पोलिसांनी संवेदनशील भूमिका घेण्याचे निर्देश देताना गृहमंत्री म्हणाले, “दलित व आदिवासी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत त्यांचे त्वरित निराकरण करण्यात यावे. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे पहिले कर्तव्य आहे.“पोलिस हे कायद्याचे प्रतिबिंब आहेत. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याबद्दल भीती निर्माण होणे गरजेचे आहे. पोलिसांनी केवळ दुचाकीवर गस्त घालण्यापुरतेच आपले कर्तव्य मर्यादित न ठेवता, स्थानिक नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या भागातील घडामोडी समजून घ्याव्यात,” असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले. या आढावा बैठकीस दक्षिण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एम.बी. बोरलिंगय्या, पोलिस अधीक्षक मल्लिकार्जुन बालदंडी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारीही उपस्थित होते. राज्य सरकारचा उद्देश कायदा व सुव्यवस्थेला बळकटी देत राज्यातील नागरिकांना सुरक्षित व शांततामय वातावरण उपलब्ध करून देण्याचा असून, त्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी यावेळी केले.
Leave a Reply