उत्तर प्रदेशातील बरेली शहरात घडलेली एक घटना एखाद्या थरारपटाला लाजवेल अशी आहे. ४० वर्षीय महिलेने महापौर डॉ.उमेश गौतम यांना अडचणीत आणण्यासाठी एक विचित्र आणि धक्कादायक कट रचल्याचं समोर आलं आहे.या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की, २९ मार्च रोजी पाच जणांनी तिला अपहरण करून, गाडीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर छातीत गोळी झाडून रस्त्यावर फेकून दिलं.जखमी अवस्थेत तिने हॉस्पिटल गाठलं आणि पोलिसांशी संपर्क साधला.मात्र पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड झालं आहे. या महिलेने एका बनावट डॉक्टराच्या मदतीने केवळ ₹२५०० च्या मोबदल्यात स्वतःच्या छातीत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गोळी बसवून घेतली होती.ही महिला २०२१ पर्यंत महापौराच्या घरात घरकाम करत होती. मात्र,महापौराच्या पत्नीने तिला कामावरून काढून टाकलं. या आधीही २०२२ मध्ये तिने महापौरांविरोधात अशीच एक तक्रार दाखल केली होती,जी तपासानंतर बंद करण्यात आली.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात तिने सांगितलं की, या हल्ल्यामागे महापौर उमेश गौतम आणि त्यांचा मुलगा पार्थ यांचा हात आहे.तिने आरोप केला की,अपहरणादरम्यान पार्थने फोन करून अपहरणकर्त्यांना “तिला संपवा” असा आदेश दिला होता.त्यानंतर तिला गोळी मारून रस्त्यावर फेकल्याचं तिने सांगितलं.मात्र,पोलिसांनी तपासादरम्यान त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, तिच्या कथेत अनेक विसंगती आढळल्या. वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं की गोळी ही कोणत्याही शस्त्रातून झाडलेली नसून ती शस्त्रक्रियेने अंगात बसवलेली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, वैयक्तिक राग किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन या महिलेने महापौर आणि त्यांचा मुलगा यांना अडचणीत आणण्यासाठी हा संपूर्ण बनाव उभा केला होता. सध्या याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Leave a Reply