भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने गतवर्षीच्या अनुभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आणि आता भविष्यात हेच ध्येय कायम असेल, असे सांगितले. ऑलिम्पिकसाठी भारताला सर्वात पहिला कोटा मिळवून देणाऱ्या रुद्रांक्षला पुढच्या राष्ट्रीय संघ निवड चाचणीत मात्र अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याचे ऑलिम्पिक स्वप्न भंगले. त्या अनुभवाने तो दुखावला, पण हरला नाही. अर्जेंटिनात झालेल्या पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई करत नव्या हंगामाची झळाळती सुरुवात केली.
रुद्रांक्ष म्हणतो, “गेल्या वर्षी खूप काही शिकायला मिळालं. मी आता प्रत्येक स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेदरम्यान जास्तीत जास्त शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करतो. तांत्रिक तयारीसोबत मानसिक बळ कसं वाढवायचं, यावर मी अधिक लक्ष केंद्रित करतो.”
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या रुद्रांक्षच्या मते, सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. “प्रत्येक खेळाडू स्वतःमध्ये सुधारणा करत असतो. पण चांगली लय राखण्यासाठी मानसिक ताकदही तितकीच महत्त्वाची आहे. राष्ट्रीय संघासाठी खेळायचं असेल, तर दर दोन महिन्यांनी निवड चाचणीला सामोरे जावे लागते, आणि तेव्हा मानसिक स्थैर्य खूपच उपयोगी ठरतं,” असे तो सांगतो. जागतिक विजेतेपद आणि जागतिक विक्रम गाठलेल्या रुद्रांक्षला ऑलिम्पिकपासून दूर राहावं लागणं हे निश्चितच एक वेदनादायक वळण ठरलं. “तो काळ खूप अवघड होता. मी पूर्ण निराश नव्हतो, पण मनात खंत होतीच. कुटुंबीय आणि प्रशिक्षक यांच्यावरही त्याचा परिणाम झाला,” असेही तो मनमोकळेपणाने मान्य करतो.
त्यावेळी मानसिक सावरासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय रुद्रांक्षने घेतला, आणि तो त्याच्यासाठी निर्णायक ठरला. “राष्ट्रीय संघटनेने आपली भूमिका ठाम ठेवली, आणि मला समजावून सांगण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. म्हणून मग मी स्वतःला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. आज त्याचा फायदा माझ्या कामगिरीत स्पष्टपणे दिसतो,” असे तो ठामपणे सांगतो. मनाच्या शांततेतून यशाची दिशा शोधणाऱ्या रुद्रांक्षचा संघर्ष आज नव्या पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा देतो आहे. ऑलिम्पिकचा अपुरं राहिलेला अध्याय आता नव्या पर्वात परिवर्तित व्हावा, अशीच त्याची तयारी आणि आशा आहे.
Leave a Reply