भारतात लठ्ठपणा ठरत आहे ‘घातक’… कर्करोगापेक्षाही अधिक धोकादायक – इप्सॉस हेल्थ सर्वेक्षण २०२५

भारतात लठ्ठपणाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून, तो केवळ एक आजार न राहता आता देशासाठी कर्करोगापेक्षाही मोठा धोका बनत चालल्याचे इप्सॉस हेल्थ सर्व्हिसेसच्या २०२५ च्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालात लठ्ठपणाला ‘ घातक’ (Silent Killer) असे संबोधले गेले असून, त्याचा नागरिकांच्या एकूण आरोग्यावर खोल परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात ३१ देशांतील २३,००० नागरिकांचा सहभाग होता, त्यापैकी २,२०० भारतीय उत्तरदात्यांनी लठ्ठपणाकडे केवळ शरीरवाढ म्हणून न पाहता, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक गंभीर आजारांचे मूळ कारण म्हणून त्याची नोंद केली आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अनियमित जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि डिजिटल युगातील वाढती निष्क्रियता ही लठ्ठपणाच्या झपाट्याने वाढीमागची मुख्य कारणे आहेत. चिंतेची बाब म्हणजे ही समस्या आता फक्त प्रौढांपुरती मर्यादित न राहता, मुलं व किशोरवयीन गटातही झपाट्याने वाढ घेत आहे.

आरोग्य मंत्रालय आणि पोषण तज्ज्ञांनी या अहवालाची गांभीर्याने दखल घेतली असून, नागरिकांनी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यावर भर देत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे. यासोबतच, शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळांवर आरोग्यविषयक जनजागृती मोहीमा राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. हा अहवाल धोरणकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा इशारा आहे. वेळेवर योग्य उपाययोजना न केल्यास, लठ्ठपणा हा ‘ घातक’ भविष्यात मोठ्या आरोग्य संकटाचे स्वरूप धारण करू शकतो, असा इशारा या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांतून व्यक्त करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *