राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात बुधवारी वाघाने ७ वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. त्रिनेत्र गणेश मंदिरातून कुटुंबासोबत परतत असताना, जंगलाच्या आत वाघाने त्याच्यावर हल्ला केला. काही वेळाने त्याचा मृतदेह जंगलात खोल आत सापडला. या घटनेनंतर मंदिरातून परतणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भाविकांनी गणेशधाम पोलिस ठाण्यात धाव घेतली व घटनेची माहिती दिली.
वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, भाविकांना सुरक्षित बाहेर काढले व मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले.त्रिनेत्र गणेश मंदिर हे ऐतिहासिक रणथंभोर किल्ल्याच्या आत आहे. हे मंदिर हिंदू भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे, जिथे लोक त्यांच्या घरी होणाऱ्या शुभकार्यांसाठी श्री गणेशाला “पहिलं आमंत्रण” देण्यासाठी येतात आणि समृद्धीची प्रार्थना करतात. मृत मुलाचे नाव कार्तिक सुमन असून तो बूंदी जिल्ह्यातील गोठड़ा गावाचा रहिवासी होता.अपघाताच्या अवघ्या अर्ध्या तास आधी त्याच्या आजोबांनी त्याचा फोटो घेतला होता तो निळ्या टी-शर्टमध्ये, जीन्स घालून मंदिराबाहेर एका लंगूरसोबत बसलेला होता.
बचाव कार्य
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले.जंगलात खोलवर जाऊन त्यांना मुलासह वाघ आढळून आला. मोठ्या प्रयत्नांनंतर वाघाला हुसकावून लावण्यात यश आले आणि संध्याकाळी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.मृतदेह सवाई माधोपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला व शवविच्छेदनानंतर कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. कृषी मंत्री किरोडी लाल मीणा यांनी रुग्णालयाला भेट देऊन कार्तिकच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वना दिली.
Leave a Reply