जालंधर पोलिसांनी जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे तैनात असलेल्या एका लष्करी जवानाला अटक केली आहे. या जवानावर अमेरिकन यूट्यूबर रॉजर संधू यांच्या घरावर ग्रेनेड फेकणाऱ्या आरोपीला प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. ही घटना १५ आणि १६ मार्चच्या मध्यरात्री जालंधरमधील रायपीर रसूलपूर गावात घडली होती.पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव सुखचरण सिंग उर्फ निक्का असून तो मुक्तसर साहिब जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि सध्या राजौरीतील १६३ इन्फंट्री ब्रिगेडमध्ये तैनात आहे.पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,आम्ही लष्कर प्रशासनाला या जवानाविरोधातील पुरावे सादर केले.त्यानंतर त्यांनी आमच्या ताब्यात त्याला दिलं. त्याला जालंधर न्यायालयात हजर केलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ग्रेनेड फेकणाऱ्या युवकाशी जवानाची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती.त्याने त्या युवकाला ऑनलाइन पद्धतीने डमी ग्रेनेडच्या साहाय्याने प्रशिक्षण दिले आणि नंतर खऱ्या ग्रेनेडचा वापर कसा करावा हे शिकवले. सुखचरण हा प्रशिक्षित लष्करी जवान असल्यामुळे त्याला शस्त्रसज्जतेचे चांगले ज्ञान होते. त्याची अधिक चौकशी पोलीस कोठडीत करण्यात येणार आहे,असेही पोलिसांनी सांगितले.या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याने स्वीकारली आहे. पंजाब पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.
शहजाद भट्टीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हल्ल्याचे व्हिडीओ अपलोड केले होते, तसेच एका व्हिडीओ संदेशात त्याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यात त्याने यूट्यूबरवर मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे त्याने परदेशातील गँगस्टर हॅप्पी पासिया याचा साथीदार झीशान अख्तर याचे या हल्ल्यातील सहकार्याबद्दल आभार मानले होते.नोव्हेंबर २०२४ पासून पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२५ पर्यंत राज्यात पोलिस ठाण्यांवर, धार्मिक स्थळांवर, राजकीय नेत्यांच्या घरांवर आणि इतर ठिकाणी अशा किमान १६ ग्रेनेड हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
Leave a Reply