जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एका प्राध्यापकाला जपानी दूतावासाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी अशोभनीय वर्तन केल्याच्या तक्रारीनंतर नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकाविरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.
जपानी दूतावासाने विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, संबंधित प्राध्यापकाने दूतावासातील अधिकाऱ्यावर अश्लील आणि लज्जास्पद लैंगिक टिप्पणी केली होती. याप्रकरणी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीने (ICC) सखोल चौकशी केली. चौकशीत प्राध्यापक दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने त्यांची निवृत्तिविना बडतर्फी करण्याचा निर्णय एकमताने घेतला.
या संदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितले की, “लैंगिक छळ, भ्रष्टाचार आणि कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनासंदर्भात विद्यापीठाचा शून्य सहिष्णुतेचा दृष्टिकोन आहे. ही कारवाई सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी एक स्पष्ट इशारा ठरणार आहे. यावर्षी प्रथमच अंतर्गत तक्रार निवारण समितीत विद्यार्थ्यांचे निवडणूक प्रक्रियेद्वारे प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले आहे.”
२०२१ मध्ये संशोधन निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या दुसऱ्या एका प्राध्यापकालाही आता बडतर्फ करण्यात आले आहे. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग करण्यात आले होते, त्यानंतर संबंधित निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील एका डीम्ड-टू-बी विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यताप्राप्त परिषद (NAAC) मान्यतेसंदर्भातील कथित लाचखोरी प्रकरणात CBIने अटक केलेल्या दहा जणांपैकी एक असलेल्या जेएनयूच्या प्राध्यापकाला, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निलंबित ठेवण्यात आले आहे.
Leave a Reply