खोटी ओळख, खरी फसवणूक;आसाममध्ये ‘जामतारा पॅटर्न क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा

सायबर गुन्हेगारी ही बिहारच्या जामतारापुरती मर्यादित राहिली नसून, देशाच्या कानाकोपऱ्यात सायबरचोरांच्या टोळ्या तयार होत आहेत.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आसाममधील मोरगाव जिल्ह्यात अशीच एक ‘जामतारा पॅटर्न’ टोळी उघडकीस आणली आहे.बँकांना बनावट आधार व पॅनकार्डच्या आधारे गंडवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी ते जून २०२४ या काळात ५५ बनावट ओळखीच्या आधारे क्रेडिट कार्ड वापरून एचएसबीसी बँकेची तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी करण्यात आली होती. या प्रकरणी बँकेचे प्रतिनिधी नयन भगदेव यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खात्रीशीर माहितीच्या आधारे आसाममधील मोरगाव जिल्ह्यात अमरागुरी, लालीपत्थर, हत्यारबोरी, तातीपोरा आणि कारीमरी गावांत शोधमोहीम राबवून पाच सायबर गुन्हेगारांना अटक केली. दोनशे मीटरवर कुणी अनोळखी दिसल्यास या गुन्हेगारांपर्यंत माहिती पोहोचते आणि ते गायब होतात. दिवसात हे चोर हाती लागतच नाही, रात्रीच्या वेळी तर चोरांचे वास्तव्य शोधणे त्याहून कठीण असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या टोळीने सिबिल स्कोर चांगल्या व्यक्तींचा डेटा मिळवून त्याच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली. नंतर विविध वित्तसंस्था व बँकांमधून क्रेडिट कार्ड मिळवून ऑनलाइन व्यवहार व रक्कम वळती करून फसवणूक केली.आदित्य बिर्ला फायनान्स, एलटी फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक यांसह अनेक संस्थांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जामतारानंतर आता आसाम हेही सायबर गुन्हेगारीचे नवे केंद्र बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँका, वित्तसंस्था आणि सामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *