व्हेंटिलेटरवर असलेल्या फ्लाइट अटेंडंटवर लैंगिक अत्याचार; गुरुग्राममधील रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या, व्हेंटिलेटरवर असलेल्या ४६ वर्षीय महिला फ्लाइट अटेंडंटवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुरुग्राम पोलिसांनी शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक (वय २५) असून तो बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. तो गेल्या पाच महिन्यांपासून मेदांता रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. गुरुग्राममधील एका खासगी विद्यापीठातून ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी विषयात पदवी मिळवल्यानंतर त्याने या क्षेत्रात कारकीर्द सुरू केली होती.

गुरुग्रामचे उपायुक्त (गुन्हे) अर्पित जैन यांनी सांगितले की, “१४ एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयातून महिलेवर लैंगिक अत्याचाराची तक्रार प्राप्त झाली. त्यावर तात्काळ एफआयआर दाखल करून विशेष तपास पथक नेमण्यात आले. तपासादरम्यान पुरावे गोळा करून आरोपी दीपकला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.”

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी ८०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी करण्यात आली. तसेच, ५० पेक्षा जास्त रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. या तपासातून आरोपीची ओळख पटवण्यात यश आले. दीपकला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला ५ एप्रिल रोजी मेदांता रुग्णालयातील आयसीयू विभागात दाखल झाली होती आणि त्यावेळी ती व्हेंटिलेटरवर होती. तिच्या म्हणण्यानुसार, ६ एप्रिलच्या रात्री, दोन परिचारिकांच्या उपस्थितीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. विशेष म्हणजे, त्या परिचारिकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असा आरोपही तिने केला.

महिलेने आपल्या निवेदनात नमूद केले की, ती अर्धवट शुद्धीत होती आणि आजूबाजूला काय घडते आहे याची तिला स्पष्ट जाणीव होती. दीपकने कंबरपट्टा तपासण्याच्या बहाण्याने तिच्यावर डिजिटल बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या तोंडापर्यंत चादर ओढून अत्याचार केला, असा आरोप तिने केला आहे.

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय दुराणी म्हणाले, “घटनेच्या तपासासाठी आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत. संबंधित सर्व माहिती, सीसीटीव्ही फुटेजसह पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, अद्याप न्यायालयात कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *