राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत सूचक भाष्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव मे ट्रुथ’ या पॉडकास्टमध्ये सहभागी होताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
मांजरेकर यांनी विचारले, “शिवसेना फुटली की नाही हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येऊ शकता का?” यावर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे उत्तर देत सांगितले, “मी कधीही आयत्यावर रेघोट्या मारत नाही.” ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदेंचं बंड हे वेगळं राजकीय गणित होतं. त्यांनी आमदार घेऊन बाहेर पडणं वेगळं होतं. मात्र मी शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा अनेक आमदार, खासदार माझ्यासोबत यायला तयार होते. परंतु, माझ्या निर्णयामागे एक स्पष्ट विचार होता – बाळासाहेबांशिवाय मी कोणाच्याही अधीन काम करणार नाही.”
राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, “मी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब असोत की उद्धव ठाकरे, दोघांपैकी कुणासोबतही काम करण्यास मला कधीच अडचण नव्हती. मात्र, अशा सहकार्याच्या मागे दोघांचीही इच्छा असणं गरजेचं आहे.”
महेश मांजरेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले, “महाराष्ट्राला मात्र तुमचं एकत्र येणं नक्कीच हवं आहे!” यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “मग महाराष्ट्रातील जनतेनेच त्यांच्याकडे जावं आणि हे सांगावं. मी अशा किरकोळ कारणांमुळे कधीच माझा अहंकार आड आणत नाही.” या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या घडामोडींचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Leave a Reply