राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते तथा माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना अज्ञात व्यक्तीकडून ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये “तुझीही अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करीन,” अशी धमकी देण्यात आली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर ही धमकी आली असून, त्यात डी-गँगचा उल्लेख करत १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर दर सहा तासांनी मेल पाठवून आठवण करून देणार असल्याचीही चेतावणी त्या मेलमध्ये देण्यात आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांचे पथक तात्काळ झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, त्यांच्या जबाबाची नोंद घेण्यात आली आहे. त्याचबरोबर, त्यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. धमकी पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला आहे.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी खेरवाडी परिसरात माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची कार्यालयाच्या मार्गावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तिघा अज्ञात हल्लेखोरांनी अतिशय जवळून गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही महिन्यांत त्यांच्या पुत्रालाही अशाच स्वरूपाची धमकी मिळाल्याने, पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दिकी यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पावले उचलली जात आहेत. तपास यंत्रणा धमकीमागील सूत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असून, याप्रकरणात गंभीर तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


Leave a Reply