कलमा म्हणताच वाचला जीव; प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा पहलगाममधील थरारक अनुभव

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसनर खोऱ्यात मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात आसाम विद्यापीठाचे असोसिएट प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा जीव मात्र त्यांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचला. त्यांनी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबाचा जीव एका युक्तीने वाचवला, याबाबतचा अनुभव त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर कथन केला.

प्राध्यापक भट्टाचार्य हे पत्नी व मुलासह पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेले होते. गोळीबार सुरू होताच त्यांनी एका झाडाच्या आडोशाला आसरा घेतला. “त्या वेळी काही जण ‘कलमा’ म्हणत होते. मीही त्यांच्या जवळ जाऊन बसलो. एका दहशतवाद्याने माझ्याकडे येऊन विचारलं, ‘तू काय करतोस?’ मी भीतीने कलमा उच्चारू लागलो – ला इलाहा इलल्लाह… तो पुन्हा विचारत राहिला आणि मी तेच उच्चारत राहिलो. त्याने काहीही न बोलता तिथून चालता झाला,” असे त्यांनी सांगितले.

भट्टाचार्य पुढे सांगतात, “दहशतवादी कोणतीही सूचना न देता, धर्म विचारून काही पर्यटकांना लक्ष्य करत होते. मी इतर पर्यटकांना कलमा म्हणताना पाहून सावधपणे त्यांच्या सोबत बसलो. एका दहशतवाद्याने दुसऱ्याला सांगताना मी ऐकलं – ‘जो राम नाव घेतो, त्याला लक्षात ठेवा.’” दहशतवाद्यांच्या नजरेतून बचावल्यानंतर भट्टाचार्य कुटुंबीय जंगलातून दोन तास चालत सुटले. या प्रवासादरम्यान एका स्थानिक व्यक्तीने त्यांना मदत केली. त्याच्या मार्गदर्शनाने ते पुन्हा सुरक्षितपणे पहलगाममध्ये परतले.

आसाम सरकारने प्राध्यापक आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्वरीत उपाययोजना केली. मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून कळवले की, “प्राध्यापक भट्टाचार्य आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षित परतीसाठी केंद्र सरकारसोबत सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.” काही प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला आहे की, दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून हल्ल्याचे लक्ष्य बनवले. भट्टाचार्य कुटुंब सध्या सुरक्षित असून, ते २६ एप्रिल रोजी श्रीनगरहून आसामला परतणार आहेत. ही घटना केवळ थरारक अनुभव नाही, तर देशात वाढणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नांवर गंभीर विचार करण्यास भाग पाडणारी ठरली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *