बीईसीआयएल घोटाळा : ईडीकडून मुंबई व फरीदाबादमध्ये धाडसत्र

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) मध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी मुंबईतील सात आणि फरीदाबादमधील एका ठिकाणी धाड टाकून तपासाला वेग दिला आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बीईसीआयएलचे माजी अध्यक्ष जॉर्ज कुरुविला आणि माजी महाव्यवस्थापक यांना अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ‘द ग्रीन बिलियन्स लिमिटेड’ (टीजीबीएल) या खासगी कंपनीसाठी बीईसीआयएलतर्फे ५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र, या कर्जासाठी दिलेली २५ कोटी रुपयांची परफॉर्मन्स बँक गॅरंटी बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, आरोप आहे की या कर्जाच्या बदल्यात कुरुविला यांनी ३ कोटी रुपयांची लाच घेतली.

टीजीबीएलकडून मंजूर रकमेचा उपयोग मूळ उद्दिष्टासाठी न करता ती इतर ठिकाणी वळवण्यात आली. संबंधित प्रकल्पदेखील प्रत्यक्षात सुरू करण्यात आलेला नाही. या संपूर्ण व्यवहारात आर्थिक फसवणूक व लाचखोरीचा गंभीर आढळून आला आहे.

सीबीआयच्या प्राथमिक तपासात कुरुविला यांच्यासह माजी जनरल अ‍ॅडव्हायझर आशीष प्रताप सिंग, माजी सल्लागार सुधीर चौहान आणि टीजीबीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक कणक्या यांची नावे पुढे आली आहेत. मार्च २०२५ मध्ये प्रतीक कणक्या यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच कुरुविला आणि आणखी एका अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणाची दखल घेऊन माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील या उपक्रमाने २०२४ मध्ये संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत सखोल तपास सुरू असून, आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी संबंधित ठिकाणी छापेमारी केली जात आहे. “गुन्ह्याचे उत्पन्न, व्यवहार आणि त्यामागील साखळी शोधण्यासाठी व आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली,” अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांनी दिली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *