शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाल्याने शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत. पूर्वी रात्री वीज मिळाल्याने महिलांना शेतीच्या कामात सहभागी होता येत नव्हते, मात्र आता दिवसा वीज उपलब्ध झाल्याने त्या शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रीय सहभाग घेत आहेत. राज्यात १,३५९ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प पूर्णत्वास गेले असून यामुळे २.१४ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सध्या कृषी पंपांसाठी दिवस आणि रात्र अशा दोन सत्रांमध्ये वीजपुरवठा केला जात आहे.
दिवसाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीज मिळाल्याने रात्रीच्या शेतीकामांची आवश्यकता कमी होणार आहे. त्यामुळे सर्पदंश, जंगली प्राण्यांचे हल्ले आणि अंधारामुळे होणारे अपघात यांसारख्या जोखमी टळतील. परिणामी महिलांच्या सुरक्षिततेत वाढ होणार असून, त्यांचा शेतीतील सहभाग अधिक प्रभावी होईल, असे ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.या निर्णयामुळे शेतीच्या कार्यक्षमतेत आणि उत्पादनक्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, एकूणच शेती उत्पन्नातही भर पडणार आहे. महिलांना अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ (MSKVY 2.0) अंतर्गत सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यभरात दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत १५,२८४ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी प्रगतीपथावर आहे. एकत्रितपणे १६,००० मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी MSKVY 2.0 योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल ऊर्जा विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. एप्रिल २०२३ मध्ये सुरू झालेल्या या योजनेद्वारे नव्याने निर्माण होणारी वीज कृषी पंपांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचवली जात आहे.


Leave a Reply