पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी संध्याकाळी सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला परिसरात दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर वाकोला पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडविणे आणि दुखापत केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी वाकोला येथे शनिवारी संध्याकाळी प्रत्येकी सुमारे ५० हून अधिक लोक जमा झाले होते. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. शोक व एकजुटीचा संदेश देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अचानक वाद निर्माण झाला आणि गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या झटापटीत काही लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हाणामारीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. चौकशीअंती सात जणांना अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नेहरू नगर परिसरात एका समुदायातील सुमारे ५० लोकांनी घोषणाबाजी करत जमाव केला होता. त्यानंतर दुसऱ्या समुदायातील लोक घटनास्थळी पोहोचल्याने वाद उफाळला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. “पूर्वीचे काही वाद पूर्णतः मिटले नसल्याने या प्रसंगी वाद उफाळल्याचे प्रथमदर्शनी वाटते,” असे त्यांनी सांगितले. या दंगलदरम्यान काही दुकानांची आणि वाहनांची तोडफोड झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. वाकोला पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली असून, इतर सहभागी व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम १८९ (बेकायदेशीर जमाव जमवणे), कलम १९१ (दंगल) आणि कलम ११५(२) (हल्ला) अन्वये स्वतःहून गुन्हा नोंदवला आहे.


Leave a Reply