वाहन चालवताना हेडफोन घालून मोबाईलवर गाणी ऐकणं, चित्रपट पाहणं, क्रिकेटचे सामने वा सोशल मीडियावर रिल्स पाहणं अशा धोकादायक सवयींमुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. याला लगाम घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (२८ एप्रिल) महत्त्वाची बैठक होणार आहे.या बैठकीत वाहन चालवताना हेडफोन वापरणाऱ्या चालकांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, याबाबत तक्रारी करता याव्यात म्हणून अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी असलेला व्हॉट्सअॅप संपर्क क्रमांक आता संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी खुला करण्यात येणार आहे.वाहन चालविताना एकाग्रता अत्यावश्यक असताना, हेडफोनमुळे ती भंग होत असून अनेक दुचाकी, चारचाकी चालक स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळ करत असल्याचे रस्त्यांवर वारंवार दिसून येत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर २२ मार्च रोजी एक धक्कादायक घटना घडली, ज्यात एसटीच्या शिवनेरी बसचा चालक क्रिकेटचा सामना पाहण्यात दंग झाला. बसमधील एका प्रवाशाने या गडबडीतून चाललेल्या बसचा चित्रण करून ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले.या चित्रणाची त्वरित दखल घेत सरनाईक यांनी एसटी महामंडळाला तात्काळ आदेश दिले आणि संबंधित चालकाला निलंबित करण्याची कारवाई सुरू केली. विशेष म्हणजे, ही बस खासगी कंत्राटदाराची असल्याने, त्या चालकावर पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश देऊन एक महिना उलटला आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कृती न झाल्याने २८ एप्रिल रोजी होणाऱ्या एसटी महामंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.हेडफोन वापरणारे वाहनचालक आता सहाजिकच लक्ष्य ठरतील, कारण प्रवाशांना त्याचे ध्वनिचित्र मुद्रण किंवा छायाचित्र आरटीओ कार्यालयाकडे पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे, प्रवाशांच्या मदतीने हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करणे अधिक सोपे होणार आहे.
एक महिन्यापूर्वी याबाबत सूचना दिल्या गेल्या होत्या. पण अद्याप कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात सोमवारी होणाऱ्या एसटी महामंडळाच्या बैठकीत मी जाब विचारणार आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. – प्रताप सरनाईक, मंत्री, परिवहन


Leave a Reply