अक्षय्य “परोपकारी” तृतीया

अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
“कालविवेक”या ग्रंथामध्ये अक्षय्य तृतीयाच्या दिवशी मनाला आनंदी, संयमी ठेवण्याचे व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. पण आपल्याकडे या दिवशी गृहप्रवेश, वाहन, सोने किंवा कोणतीही मौल्यवान खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. बाहेर वैशाख वणवा पेटत असताना, मनात निश्चयाचे बीज जपावे, आपल्यापेक्षा दुसर्‍यांच्या आनंदाचा, समाजसुखाचा विचार करावा, असे हा सण सांगत असावा, असे मला वाटते. कारण याच दिवशी नर-नारायण या देवांचा जन्म झाला अशी कथा आहे. “नर” म्हणजे माणसाचा “नारायण” , म्हणजे देव बनू शकतो, असे ही कथा सांगते. अर्थात जेव्हा एखादा माणूस परोपकारासाठी आयुष्य वेचतो, तेव्हाच नारायण होतो… अशी ही कथा असू शकते….
आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जैन आणि बौद्ध धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला कुठे आखाडी, तर कुठे आखा तीज असेही म्हणले जाते. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे, मूर्तीचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. त्यामागे कोणते कारण किंवा कथा असावी, हे मला ठाऊक नाही.

मात्र मला या अक्षय्य तृतीया सणाशी संबंधित दोन दंतकथांचे संदर्भ खूप समर्पक वाटतात. एक म्हणजे, अक्षय तृतीयेच्याच दिवशी भगीरथ राजाच्या तपश्चर्येने गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले. आणखी एका पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी अक्षय्य तृतीयाच्या याच दिवशी धर्मराजासह पांडवांना “अक्षय पात्र” भेट दिले होते. कारण “अक्षय” या शब्दाचा अर्थच आहे, ज्याचा क्षय, म्हणजे नाश नाही, तो अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा. ज्याची चिंता प्रत्येक प्रजाहितदक्ष राज्यप्रमुखाला असते. म्हणून ही अक्षय तृतीया जगासमोर असलेल्या समस्त चिंता दूर करणारी ठरो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.

भगीरथ राजाच्या अथक प्रयत्नांतून गंगा नदी पृथ्वीवर आली, असे या कथेत सांगितले आहे. त्यातील प्रत्येक प्रसंग भगीरथ राजांची परीक्षा पाहणारा आहे. आपल्या पूर्वजांना “पुरेसे पाणी मिळाले नव्हते”, तशी स्थिती अन्य लोकांची होऊ नये. त्यासाठी गंगा पृथ्वीवर यावी, हा त्यांचा अट्टाहास होता. तीन वेळा कठोर तपश्चर्या करूनही तो निश्चय पूर्ण झाला नाही. अखेर त्या “भगीरथ प्रयत्नापुढे”, देवांनाही हात टेकले. देवांनी त्याचे म्हणणे मान्य केले. त्यानुसार शंकराच्या जटेतून निघालेल्या गंगेला हिमालय ते गंगासागर अशी वाट दाखवत भगीरथ पुढे चालत गेला. आणि पश्चिम बंगालात गंगा सागर येथे थांबला. त्याचे ते कष्ट आणि निर्धार पाहून ब्राह्णदेवाने गंगेचे नाव ‘भागीरथी – गंगा’ असे ठेवले होते.

आज राज्यात, देशात ज्या पद्धतीने उन्हाळा वाढलाय, पाणीटंचाईने लोकांचे जगणे असह्य बनत चालले आहे. तापमान वाढ हा प्रश्न जगाला विनाशाकडे नेणारा ठरतोय त्याकाळात, पाण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या या पहिल्या राजाची कथा, आपल्या लोकहितकारक शासनकर्त्यांना प्रोत्साहन देणारी ठरावी.
भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजासह पांडवांना “अक्षय पात्र” भेट देण्याची कथाही अशीच मनात परोपकाराची भावना जागवणारी. अज्ञातवासात असताना राज वैभवात वाढलेले, पण परिस्थिती मुळे जंगलात राहणारे पांडव आणि द्रौपदी कंदमुळे, फळे खाऊन राहू शकत होते. मात्र जेव्हा त्यांच्याकडे अतिथी येत, साधू, ऋषी , मुनी भोजनाच्या सुमारास येत, तेव्हा या पांडवांची तारांबळ उडत असे. सगळ्यात जास्त त्रास द्रौपदीला होई. म्हणून धर्मराजाने कृष्णाची प्रार्थना केली, की “आम्ही राजपदापासून दूर झालो आहोत. अज्ञातवासात असल्याने आम्हाला पराक्रम दाखवण्यास मर्यादा पडतात. त्याचा विचार करून, कृष्णा, आमच्याकडे येणाऱ्या याचकांना भोजन देता येईल, असे सामर्थ्य मला दे,” कृष्णाने त्यांची अडचण ओळखली, त्यानंतर हे “अक्षय पात्र” पांडवांना लाभले. ज्यातून पांडवांकडे कोणत्याही प्रसंगी येणाऱ्या अतिथीला पोटभर अन्न देणे शक्य होई.

भगीरथ ते धर्मराज युधिष्टिर या पौराणिक राजांच्या कथांमध्ये दुसऱ्यांच्या सुखाचे विचार ठळकपणे प्रतिबिंबित झालेले दिसतात. जो आपल्या प्रजेला अक्षय सुख देण्याचा प्रयत्न करतो , त्याचे नाव अक्षय राहते, हेच या कथा सांगतात… सत्कार्याची, सत्कर्माची पुण्याई क्षणिक संकटाने कधीच काळवंडत नसते… बावन्नकशी सोने झळाळून उठतेच उठते…
म्हणुन महाराष्ट्र आणि देशातील राजकारणी मंडळीनी समाज हिताला प्राधान्य द्यावे, हेच खरे.
सगळ्यांना अक्षय्य्य यश लाभो !
या अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभकामना !

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *