सुमारे सात वर्षांपूर्वी, २९ ऑक्टोबर २०१८ रोजी, बाह्य दिल्लीतील बवाना येथील रहिवासी सुनिता ही हरियाणातील सोनीपत येथे सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, घर सोडल्यानंतर काहीच मिनिटांत दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर गोळीबार केला. तिला तीन गोळ्या लागल्या आणि ती जागीच मृत घोषित करण्यात आली. पोलिसांनी सलग तीन दिवस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी अथक प्रयत्न केले. या दरम्यान, सुनिताच्या मुलांचीही सखोल चौकशी करण्यात आली. तपासाचा वेग खऱ्या अर्थाने वाढला, जेव्हा पोलिसांच्या हाती सुनिताची वैयक्तिक डायरी लागली. त्या डायरीतील नोंदींनी खळबळजनक माहिती समोर आली सुनिताच्या पती मंजित सेहरावतचे दिल्लीस्थित मॉडेल एंजेल गुप्ता हिच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या नात्यामुळे दांपत्य जीवनात सातत्याने वाद होत होते, हे स्पष्ट झाले.
सोमवारी दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने सुनिता हत्याकांड प्रकरणात मोठा निर्णय देत मंजित सेहरावत, दिल्लीतील मॉडेल एंजेल गुप्ता, तिचे सावत्र वडील राजीव गुप्ता, ड्रायव्हर दीपक गुप्ता, दीपकचा मामा धर्मेंद्र तसेच मारेकरी विशाल आणि शहजाद सैफी या सात जणांना दोषी ठरवले.या निकालात विशेष न्यायाधीश धीरेंद्र राणा यांनी स्पष्ट नमूद केले की, अभियोजन पक्षाने मंजित सेहरावत आणि एंजेल गुप्ता यांच्या विरोधातील खुनाचा हेतू ठोसपणे न्यायालयासमोर सिद्ध केला आहे. “ते दोघे कोणत्याही परिस्थितीत एकमेकांपासून वेगळे होण्यास तयार नव्हते, तर सुनिता मात्र त्यांचा विवाहबाह्य संबंध मान्य करण्यास कटाक्षाने नकार देत होती. म्हणूनच तिला मार्गातून दूर करण्याचा कट रचण्यात आला,” असे न्यायाधीशांनी नमूद केले.
सुनिताच्या डायरीतील नोंदींना महत्त्व देत न्यायालयाने म्हटले की, “डायरीतून स्पष्ट दिसते की सेहरावत आणि एंजेल गुप्ता यांच्यात विवाहबाह्य संबंध होते.”हत्या होण्याच्या आधीचा निर्णायक क्षण म्हणजे करवाचौथचा सण. या सणाच्या दिवशी सेहरावतने पत्नी सुनितासोबत हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती मिळताच अॅन्जेल गुप्ता हिने आत्महत्येची धमकी दिली होती. याच क्षणानंतर खुनाचा कट आखण्यात आला, असा ठाम निष्कर्ष न्यायालयाने मांडला.न्यायालयाने स्पष्ट केले की,हा खुन पूर्वनियोजित कट होता आणि तो शंका न ठेवता सिद्ध झाला आहे. बँकेतील व्यवहार, मोबाईल लोकेशन्स, सीसीटीव्ही फुटेज, एफएसएल अहवाल, आरोपींचे संशयास्पद वर्तन, जप्त करण्यात आलेली कार,दुचाकी आणि शस्त्रं –या सगळ्या पुराव्यांवरून हा कट उघड झाला आहे.
सर्व आरोपींनी यामध्ये सक्रीय सहभाग घेतलेला होता, असेही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले.
मंजित सेहरावत, एंजेल गुप्ता, दीपक, विशाल, धर्मेंद्र आणि शहजाद यांना सुनिताच्या खून व त्या संदर्भात रचलेल्या कटाच्या आरोपांखाली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विशेष म्हणजे, मारेकरी विशाल आणि शहजाद यांना शस्त्र अधिनियमांतर्गतही दोषी ठरवण्यात आले आहे.न्यायालयाने स्पष्ट केले की, विशाल आणि शहजादकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे हत्येच्या घटनेतच वापरण्यात आली होती, आणि सुनिताच्या मृत्यूचे नेमके कारण म्हणजे गोळीबारातून झालेल्या गंभीर जखमा होय.तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीप्रमाणे, या शूटर्सना १० लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर मृत सुनिताचे फोटो, तिची वैयक्तिक माहिती आणि ती दररोज शाळेत जाणारा मार्ग याचे तपशील देखील आरोपींकडून मारेकऱ्यांना पुरवण्यात आले होते, असेही न्यायालयाच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply