पनवेल : शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम म्हात्रे यांचा मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय

शेतकरी कामगार पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडत ‘एकला चलो’चा निर्णयाची घोषणा शेकापच्या एका नेत्याने केली आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेकापचे पनवेल आणि उरणचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी स्वत: मंगळवारी पनवेल ‘शेकाप’च्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत ‘एकला चलो’चा निर्णय जाहीर केला. यामुळे ‘शेकाप’मध्ये भविष्यात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दीड महिन्यांपूर्वी म्हात्रे यांनी मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी व स्थानिक नेते यांची बैठक लावून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असे आवाहन पक्ष नेतृत्वाकडे केले होते.

या दरम्यान पक्षाच्या १४ माजी नगरसेवकांमधील सत्तेत नसल्याने अस्वस्थता वाढल्याने ‘शेकाप’ला नवी दिशा देण्याचे बेत आखले जात होते. म्हात्रे यांच्या प्रश्नावर कोणताच निर्णय ‘शेकाप’च्या नेत्यांनी न घेतल्यामुळे म्हात्रे यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक बोलावून स्वत: महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला. ‘बैठकीत मी महाविकास आघाडीतून वैयक्तिक बाहेर पडल्याचा निर्णय जाहीर केलं. मी अजूनही कोणत्याही इतर राजकीय पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी या क्षणापर्यंत ‘शेकाप’मध्ये आहे, असे जे. एम. म्हात्रे यांनी सांगितले. तर आमचे सहकारी जे. एम. म्हात्रे यांना आम्ही महाविकास आघाडीत राहूनच इतर राजकीय पक्षांशी स्पर्धा करू शकतो हे गणित समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी महाविकास आघाडीत राहण्यास विरोध दर्शविला आहे, असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.

जे.एम म्हात्रे यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांनी उरणमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात भाजपचे महेश बालदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर रिंगणात होते. महाविकास आघाडीत असूनही मविआच्या दोन उमेदवारांनी उरणमधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे शेकापमध्ये प्रचंड नाराजी होती. प्रितम म्हात्रे विजयाच्या थोड्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे हा पराभव त्यांच्या आणि शेकापच्याही जिव्हारी लागला होता.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *