प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ,न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली

बंगळुरुमधील जनप्रतिनिधींवरील गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मंगळवारी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा बलात्कार प्रकरणातील खटला पुढे ढकलण्याचा अर्ज फेटाळून लावला. रेवण्णा यांनी नव्या वकिलाची नेमणूक होईपर्यंत वेळ मागितली होती,मात्र न्यायालयाने ही मागणी चालू खटल्यात उशीर करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट केलं.न्यायालयीन प्रक्रिया ही केवळ आरोपीच्या हक्कापुरती मर्यादित नसून, पीडितेचाही हक्क समानपणे विचारात घेणं आवश्यक असतं,” असं न्यायालयाने नमूद केलं.प्रज्वल रेवण्णा यांच्यावर २०२४ मध्ये दाखल झालेल्या चार बलात्कारप्रकरणांपैकी एका प्रकरणात ही सुनावणी होत आहे.

या प्रकरणात ते त्यांच्या शेतातील एका घरकाम करणाऱ्या महिलेसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला खटल्याची तारीख २३ एप्रिल होती, मात्र आता न्यायालयाने खटल्याची पुढील तारीख २ मे अशी निश्चित केली आहे.
दरम्यान, प्रज्वल रेवण्णा यांच्या माजी वकिलांनी न्यायालयावर पक्षपातीपणाचा आरोप करत खटल्यातून माघार घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने रेवण्णा यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत सरकारी वकील देण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र, त्यांनी तो नाकारत आणखी वेळ मागितला.

जरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वकील न्यायालयात उपस्थित असले, तरी आरोपीने त्यांची मदत घेण्यास नकार दिला आहे. हे पाहता, आरोपीचा हेतू फक्त खटल्याची प्रक्रिया टाळण्याचा आहे, असा ठपका विशेष न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवला.विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन महिन्यांत सुनावणी पूर्ण होणे आवश्यक आहे.२ मे रोजी खटल्याला सुरुवात होणार असून, न्यायालयाने पीडितेसह इतर साक्षीदारांना समन्स बजावले आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *