उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि शिंदेसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यात निधीवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 400 कोटी निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केल्यामुळे या विभागाचा पहिला क्रमांक आला, अशी मिश्किल टिपण्णी संजय शिरसाठ यांनी केली आहे. इतकंच नाही तर सामाजिक न्याय खातेचं बंद करा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता.यावर अजित पवार यांना शिरसाट यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी शिरसाट यांच्या नाराजीचा मुख्यमंत्री विचार करतील, असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं.
नेमकं काय म्हणाले होते संजय शिरसाट?
संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या खात्याचे पैसे इतरत्र वर्ग करण्यात आल्याचे मला माध्यमांतून समजले. याबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती. जर सामाजिक न्याय खात्याची सरकारला गरज वाटत नसेल, तर ते सरळ बंद करा. हा अन्याय आहे की कट, हे मला माहित नाही. मात्र, यावर मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. माझ्या खात्याचा निधी ना वर्ग करता येतो, ना त्यात कपात करता येते. याबाबत काय नियम आहेत की नाही, हेच कळत नाही. माझे सुमारे 1500 कोटी रुपये प्रलंबित आहेत आणि ही देणी दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. माझं काम पत्र पाठवण्यापुरतं आहे, निर्णय घेणं त्यांचं काम आहे. पण ते निर्णय कोणत्या आधारावर घेतले जातात, याची माहितीही दिली जात नाही. कायद्यानुसार सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवता येत नाही. तरीही काही अधिकारी कायद्यातील पळवाटा शोधून निधी वळवत आहेत, हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारे दलित भगिनींसाठी असलेला निधी अन्यत्र वळवणे अन्यायकारक आहे, असे त्यांनी म्हटले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय आभाळातून पैसे आणणार आहेत का? – हसन मुश्रीफ
लाडकी बहीण ही लोकप्रिय योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना महिन्याला पैसे देताना अर्थ विभागाची ओढाताण होते. त्याचा कमी-अधिक परिणाम सर्वच विभागांवर झाला आहे, हे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी समजून घेतले पाहिजे. नाहीतर लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय आभाळातून पैसे आणणार आहेत का…? असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी साेमवारी कोल्हापुरात लगावला.याबाबत पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत, ते नव्यानेच मंत्री झाल्याने त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेणे अपेक्षित आहे. माहिती न घेता ज्येष्ठ नेत्यांवर बोलणे चुकीचे आहे.


Leave a Reply