मुंबई : मुंबईची सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या प्रभादेवीमातेच्या मंदिराचा ३११ वर्धापन दिन ८ मे रोजी साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी सहकुटुंब प्रभादेवीमातेच्या दर्शनाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभादेवी जनसेवा समितीच्या वतीने करण्यात आले.प्रभादेवीच्या प्रभावती देवीचा फार जुना इतिहास आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शाखंभरी पौर्णिमेला प्रभादेवी मातेची यात्रा असते. ही यात्रा म्हणजे प्रभादेवी परिसरातील नागरिकांसाठी मोठा उत्सव असून, देवीची यात्रा आजही मुंबईची सांस्कृतिक परंपरा जोपासत आहे. बाराव्या शतकात देवीला शाकंबरी नावाने ओळखले जात होते. गुजरातमधील यादवांचा राजा बिंब यांची ती कुलस्वामिनी होती. मुघल साम्राज्यांनी गुजरातमध्ये जेव्हा आक्रमण केले त्या वेळेस ती मूर्ती कर्नाटकमध्ये हलविण्यात आली होती.

तिथून पुढे ती मूर्ती माहीमच्या खाडीत वाहत येऊन आता जिथे प्रभावती देवीचे वास्तव्य आहे; त्याशेजारील विहिरीत वाहत आली. तब्बल सहा शतकांनंतर श्याम नायक यांच्या स्वप्नात येऊन प्रभावती देवीच्या रूपात त्यांना दर्शन झाले. प्रभादेवी परिसराला ज्या देवीमुळे नाव प्राप्त झाले त्या प्रभावती देवीची स्थापना वैशाख शुद्ध एकादशीला सन १७१६ साली पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक यांनी केली.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभावती देवी, चंडिका देवी व कालिका देवी अशा देवीच्या तीन मूर्ती असून, लक्ष्मी नारायण, शिव लिंग, हनुमंताची व खोकला देवीच्या मूर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आली आहे. गोल्फादेवी, प्रभादेवी व जाखादेवी अशा या तीन बहिणी. या देवींमुळे वरळी, प्रभादेवी, दादर परिसराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.प्रभावती देवी अनेक ज्ञाती-समाजाची कुलदेवता असल्याने विविध जाती-धर्मांतील लोक दूरहून देवीची ओटी भरण्यासाठी येतात.


Leave a Reply