नाट्यकर्मी अशोक मुळ्ये ऊर्फ मुळ्ये काका, ज्यांची अफलातून आणि अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष ख्याती आहे. गेल्या वीस वर्षांपासून, सामाजिक भान ठेवून कार्यक्रम कसे आयोजित करता येतात, याचा आदर्श वस्तुपाठ मुळ्ये काका यांनी घालून दिला आहे. तर या अशा, मुळ्ये काका यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा भरलेल्या पत्रकार संमेलनाचे आयोजन परवा, रविवारी केले होते. एक ‘दैनिक वाचक’ या नात्याने केलेले हे नेटके आयोजन व्यासपीठावरील नेपथ्य ते सुग्रास भोजनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर खुलत गेलेले दिसले. काकांनी या संमेलनाचे शीर्षकच “अध्यक्ष” नसलेले “माझे” पत्रकार संमेलन असे ठेवले होते. त्यामुळे औपचारिकतेला कुठेच स्थान नव्हते. योगायोगाने, मला त्याच दिवशी सकाळी मराठी पत्रकार परिषदेचा “आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार” जाहीर झाला, म्हणुन काकांनी माझा न्या सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार केला…
आपल्या प्रास्ताविकात, मिश्किल आणि रोखठोक भाषणातून मुळ्ये काका यांनी या संमेलनाच्या आयोजना मागील हेतू सांगितला. “आपल्या कारकीर्दीत ज्या पत्रकार मंडळींची मदत झाली, त्यांच्यासाठी एक असे संमेलन भरवले पाहिजे, ज्यात सुश्राव्य संगीत मैफल असेल, सुग्रास भोजन आणि गप्पांची रेलचेल असेल, हे दोन वर्षापासून मनात होते. आज ते प्रत्यक्षात आले, याचा आनंद आहे” असे मुळ्ये म्हणाले. आपल्या शाब्दिक फटकेबाजी सह मुळ्ये यांनी, गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा धावता आढावा घेतला. या कार्यक्रमा दरम्यान, माझ्या सत्कारानंतर एबीपी माझाचे कन्सल्टंट एडिटर प्रसन्न जोशी यांनी माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कामासंदर्भात भाषण केले.
ते म्हणाले, १९९१ पासून तीन दशके महेश म्हात्रे यांनी बहुविध आणि बहूमाध्यमिय पत्रकारिता केलीय. गीतकार सुधीर फडकेंनी ज्याप्रमाणे प्रतिभेची ‘रेंज’ जपली, तशाच पद्धतीने आयुष्यभर रेंज जपून पत्रकारिता करणारे म्हणजे महेश म्हात्रे, या शब्दात प्रसन्ना जोशी यांनी म्हात्रे यांचे वर्णन केले. अशा प्रकारची बहुभाषिक आणि बहु माध्यमांची रेंज असणारे खूप कमी पत्रकार आहेत. सध्याची पत्रकारिता एकांगी आणि आक्रस्ताळेपणाकडे झुकत असताना महेश म्हात्रे यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियात निर्विष, निष्पक्ष पत्रकारिता केलीय आणि ते मला फार विशेष वाटतं, असं प्रसन्न जोशी म्हणाले. मराठी पत्रकारितेतील महेश म्हात्रें यांचं फीचर्स लेखन विशेष चांगले असते, मी आवर्जून वाचतो”, असं देखील ते सांगायला विसरले नाही…
न्या सत्यरंजन धर्माधिकारी आणि महेश म्हात्रे यांनी आपल्या भाषणात मुळ्ये काकांच्या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुळकर्णी- आपटे यांनी सांगितले की, आजच्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे चार माजी अध्यक्ष या कार्यक्रमात उपस्थित आहेत. एव्हढी उपस्थिती पत्रकार संघाच्या कार्यक्रमालाही नसते. हेच या कार्यक्रमाचे यश आहे. “मुळ्ये काका यांच्या कामाला मिळालेली ही मोठी पावती आहे, असे मला वाटते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि यशस्वीतेसाठी अॅड संजीव सावंत, डॉ लीना सावंत, श्री आणि सौ महेश मुदा, नरेंद्र हे टेबल नीता लाड, विनायक गवांदे यांचे सहकार्य लाभले. एकूणच काय, तर हे पहिले पत्रकार संमेलन संस्मरणीय ठरले.
महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply