मुंबई : भारतीय सैन्याने अद्भुत धैर्य दाखवत देशाची सुरक्षा सुनिश्चित केली आणि पाकिस्तानला कठोर धडा शिकवला.या धाडसी आणि यशस्वी कारवाईबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक करत रिपब्लिकन पक्षाने देशभरात ‘भारत झिंदाबाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे ऑपरेशन देशाच्या ताकदीचे आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. जर भारताला पीओके सोपवण्यास नकार दिला तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारावे, असं देखील आठवले म्हणाले.
या ऑपरेशनमध्ये भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्कराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्याचा आम्हाला अभिमान आहे. २२ मे ते ६ जून या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये ‘भारत झिंदाबाद यात्रा’ आयोजित केली जाईल, ज्यामध्ये तिरंगा ध्वज घेऊन यात्रा काढली जाईल. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासियांना हा प्रवास यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
बीएमसी निवडणुकीत उपमहापौरपद आणि 12 जागांची मागणी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या, अशी पक्षाची भूमिका असल्याचे मत आरपीआय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसंच आरपीआय(ए) ला बीएमसीमध्ये उपमहापौरपद हवे आहे. एनडीएने बीएमसी निवडणुकीत आरपीआयला १०/१२ जागा द्याव्यात, अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केलीय.


Leave a Reply