बीड : बीडच्या लिंबागणेश परिसरातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत महाजन वाडी येथे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे 2 च्या सुमारास 15 ते 20 चोरटे चोरीच्या उद्देशाने प्रकल्पात घुसले. त्यांनी दरवाजा देखील तोडला. तैनात असलेले गार्ड माजी सैनिक रुपसिंह टाक यांनी त्यांना विरोध केला असता चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातून बचावासाठी त्यांनी चोरांवर 2 राउंड फायर केले. ज्यामध्ये एकजण ठार झाला आहे. टाक यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला असता गस्तवर असलेलं पथक तिथे हजर झालं. प्रथमदर्शनी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सुरक्षारक्षक टाक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले आणि कसून चौकशी केली. काही तासानंतर सुरक्षारक्षकाने आपण बचावासाठी गोळीबार केला असून त्यात एकजण ठार झाल्याचं पोलिसांना सांगितलं. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव शोध घेतला असता तिथे एक मृतदेह आढळून आला. ठार झालेला व्यक्ती हा धाराशिव जिल्ह्यातील असून त्याची ओळख पोलिसांनी आणखी जाहीर केलेली नाही.
चोरीचा प्रयत्न झाला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी सुरक्षाराक्षकाने फायर केल्याचं माहिती आहे. प्रकरणात चोरीचा आणि खुनाचा असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याबाबतचा अधिक तपास आम्ही करत आहोत, असं पोलीस सांगतायत.पवनचक्की आणि वाद हे बीड जिल्ह्यात समीकरण होऊन बसले आहे. याआधी माजलगाव येथील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी वाद झाला होता. या वादातून सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. आता त्याच्या काही किमी अंतरावर असलेल्या लिंबागणेश परिसरात ही घटना घडली आहे. याआधीही अनेकदा शेतकरी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मावेजा आणि अडवणूक होत असल्याने वादाच्या घटना घडल्या आहेत. आता लिंबागणेश प्रकरणात पुढे काय समोर येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply