शरद पवार गटाला पाटणमधून मोठा धक्का; हा नेता भाजपच्या वाटेवर

सातारा : जिल्ह्यातील पाटणमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षाचे पाटण येथील महत्वाचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. सत्यजीत पाटणकर हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून स्थानिक पातळीवर त्यांची चांगली पकड आहे. विशेषतः पाटण मतदारसंघात त्यांचे स्वतःचे कार्यकर्त्यांचे मजबूत जाळं असून ते शंभुराज देसाई यांचे थेट प्रतिस्पर्धी मानले जातात.

समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात

शंभुराज देसाई सध्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री असून ते भाजपाचे प्रतिनिधित्व करतात. अशा स्थितीत सत्यजीत पाटणकर भाजपात गेल्यास या भागातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्येही याबाबत उत्सुकता आहे. पाटणकर गटाचे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील भाजपाच्या जवळ जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी ही स्थिती चिंतेची बनली आहे.

बैठकीनंतर घोषणा करण्याची शक्यता

राज्यात महायुतीचे सरकार आहे. केंद्रात देखील एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या आधी सत्यजितसिंह मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच आपल्या आगामी राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी पाटणकर गटाने सोमवारी बैठक त्यांनी बोलवली आहे. माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याची माहिती पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली आहे. या बैठकीला सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर आणि तालुक्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सत्यजीत यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *