बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा अनेकदा केला जात होता. आदी आमदार सुरेश धस, अंजली दमानिया आणि आता बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी देखील वाल्मिक कराड याला खाण्यात चिकन, मासे आणि फरसाण दिले जाते आणि इतर सोयी सुविधा दिल्या जातात, असा दावा केला होता. या दाव्यानंतर बीड कारागृहाचे जेलर बक्सर मुलाणी यांची लातूर येथील कारागृहात बदली करण्यात आली आहे.
वरील लोकांनी केलेल्या आरोपामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं आहे. मात्र कारागृह अधीक्षक मुलाणी यांनी स्पष्ट केले की त्यांची बदली निलंबित उपनिरीक्षक रणजित कसाळे यांनी केलेल्या आरोपांशी संबंधित नाही. TOI शी बोलताना मुलाणी म्हणाले, “२४ मे रोजी माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर राज्य कारागृह विभागाने माझी लातूरला बदली केली. ही प्रशासकीय बदली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना व्हीआयपी वागणूक देण्यात आल्याच्या बडतर्फ उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलेल्या खोट्या आरोपांशी माझी बदलीचा काहीही संबंध नाही. कारण कासले हर्सूल मध्यवर्ती कारागृहात होते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बीड कारागृहात ठेवण्यात आले नव्हते.”, असं जेलर म्हणाले.
एका खटल्यात जामिनावर सुटलेले कासले यांनी शनिवारी आरोप केला की वाल्मिक कराड याला तुरुंगात विशेष वागणूक मिळते. त्यांनी सांगितले की कराड यांना आठवड्यातून दोनदा मांसाहारी जेवण मिळते आणि ते इतर कैद्यांच्या नावाचा वापर करून तुरुंगाच्या कॅन्टीनमधून २५,००० ते ३०,००० रुपयांपर्यंतच्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. कराडला प्रीमियम चहा आणि एक सुपीरियर ब्लँकेट मिळत असल्याचा दावाही करण्यात आला होता.


Leave a Reply