शेफ विष्णू मनोहर 27 ऑक्टोबरला करणार विश्वविक्रम
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर रविवार, 27 ऑक्टोबर 2024 रोजी ‘न थांबता 24 तास डोसे बनविणे’ आणि ‘24 तासात जास्तीत जास्त डोसे बनविणे’ अशा दोन विश्वविक्रमांना गवसणी घालणार असून नागपूरकरांना चटणीसह या डोस्यांचा चोवीस तास आस्वाद घेता येणार आहे.
गिरीशभाऊ गांधी खुले रंग मंच, विष्णूजी की रसोई परिसर, बजाज नगर, नागपूर येथे सकाळी 8 वाजतापासून विष्णू मनोहर तीन वेगवेगळ्या भट्टयावर तवे ठेवून प्रत्येक तव्यावर आठ या प्रमाणे एकावेळी 24 डोसे तयार करतील. तयार झालेल्या डोस्यांचा उपस्थितांना चटणीसह आस्वाद घेता येणार असून त्याकरिता 800 ते 1000 किलो चटणी तयार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
कार्यक्रमस्थळी सर्वांना नि:शुल्क प्रवेश राहणार आहे. प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर ‘एकास एक’ याप्रमाणे डोसे वितरीत केले जातील. मध्यरात्रीदेखील डोसे खाण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. डोश्यांसोबतच 24 तास हिंदी-मराठी गाणी, गझल, भजन, एकपात्री प्रयोग, स्टँडअप कॉमेडी असे भरपूर मनोरंजन राहणार आहे.
सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 पर्यंत विष्णू मनोहर साधारणपणे 5000-6000 हजार दोसे तयार करतील. या उपक्रमाची सांगताना ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाने होणार आहे. हा संपूर्ण उपक्रम श्रीमती स्मिता लक्ष्मण गडीकर यांना समर्पित केला आहे.
अंधविद्यालय, स्पेशल मुलांच्या शाळा, तृतीयपंथियांचा संघ, अनाथाश्रम, मुकबधीर विद्यालय, वृद्धाश्रम आदी संस्थांना देखील डोसे वितरीत केले जाणार आहेत. डोस्याचा आस्वाद 24 तास घेण्यासाठी व एका विश्वविक्रमाचा भाग होण्यासाठी यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छूक संस्थांनी नि:शुल्क नोंदणीकरिता 9970244432 (चेतन) व 9404191314 (धनश्री) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply