मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘अनादी मी, अनंत मी’ या देशभक्तीपर गीताला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान केला. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्यावतीने सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी हा समारंभ पार पडला. या पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे. लोकांना प्रेरणा देणाऱ्या गाण्याला सन्मानित करण्यासाठी राज्याच्या संस्कृती विभागाने यावर्षी हा पुरस्कार सुरू केला. या पुरस्काराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले. अमित शहा आणि फडणवीस यांनी सावरकर फाउंडेशनच्या प्रतिनिधींना सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे केवळ योद्ध्याचेच नाही तर एका विचारवंत, निर्भय आणि साहित्यप्रेमी राजाचेही उदाहरण आहे. त्यांचे जीवन आपल्याला लढण्याची प्रेरणा देतेच, शिवाय संस्कृती आणि विचारांचे जतन कसे करायचे हे देखील शिकवते.”ते पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादी मी, अनंत मी…’ हे गीत त्यांच्या आत्मविश्वासाचे, देशभक्तीचे आणि अमर विचारांचे प्रतीक आहे. अशा गीतांचा सन्मान करणे ही आपल्या सांस्कृतिक जबाबदारीचा एक भाग आहे. म्हणूनच राज्य सरकारने या गीताला पहिल्या प्रेरणा गीत पुरस्काराने सन्मानित केले आहे.”
Leave a Reply