स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआदी पडद्यामागे वेगळं काही घडत तर नाही ना?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ग्रीन सिग्नल दिला आहे. स्थानिक पातळीवरची ताकद दाखवण्यासाठी ही या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची निवडणूक असणार आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची. भाजप आणि उद्धव सेनेत बीएमसी ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी एकत्र निवडणुका लढण्याबाबत सूतोवाच केला आहे. मात्र यादरम्यान घडत असलेल्या घटनांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुंकाआधी राजकीय उलथापालथ होते की काय? असा प्रश्न पडताना दिसतोय.आता असे प्रश्न का पडताहेत याला काही घटना आणि विधानांची जोड आहे.

शरद पवारांची कबुली आणि चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गटं या पक्षांची पडली. या घटनांनंतर काका-पुतन्यांनी एकमेकांविरुद्ध टीका करायची एकही संधी सोडली नाही. बारामती विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण ते पाहिलंय. मात्र अचानकचं अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील सुसंवाद वाढलेला पाहायला मिळत आहे. अनेक व्यासपीठावर दोघे फक्त सोबतच दिसत नाहीयेत तर बोलतानाही दिसत आहेत. इतकंच नाही तर एका मुलाखतीत शरद पवारांनी कबुलच करून टाकलं की आमच्या पक्षात आमदारांचा एक मोठा गट आहे जो अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ इच्छितोय. त्याबाबतीतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असं देखील त्यांनी बोलून टाकलं. तेंव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर दोन्ही पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या. परंतु यावर पवारांच्या जवळचे मानले जाणारे राऊत यांनी खोचक शब्दात यावर उत्तर दिलं. सुप्रिया सुळे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, भाजप सोबत जाण्याची काही लोकांना तहान लागली आहे. पण तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पीत नाही”. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, राउतांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये. यात उद्धव सेना आणि शरद पवार गट यांच्यातच लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र काहीही असलं तरी शरद पवारांनी केलेल्या विधानाला अनेक अर्थ असतात यावेळीही काय अर्थ काढायचा, यावर राजकीय तज्ज्ञ तर्कवितर्क लावत आहेत.

फडणवीसांनी गायले पवारांचे गोडवे

त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे तर अनेकांच्या भुवया उंचावल्याच पण त्यासोबत राजकीय वर्तुळात पुन्हा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. शरद पवार हे जय-पराजय याचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात. ते कोणत्याही परिस्थितीत काम करत असतात. या वयातही शरद पवार काम करतायत. त्यांच्या इतकं कुणीही काम करत नसेल”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर स्थुतीसुमने उधळली. कधीकाळी पवारांवर टीका करणारे फडणवीस आणि कौतुकाचे गोडवे गात असल्याने नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न पडत आहे. त्यात परत संजय राउत यांनी उडी घेतली. “पवारांचं कौतुक म्हणजे शरद पवारांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल”, असा टोला संजय राऊतांनी लगावला. “आम्हाला शरद पवारांचं कौतुक करताना कुणाची परवानगी लागत नाही. पण भाजपचे सर्व निर्णय हे धोरणात्मक असतात”, असं संजय राऊत म्हणाले.

फडणवीस म्हणाले शिंदे आणि पवार दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात चांगले नाहीत

महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीमधील आणखी एका वक्तव्याची चर्चा आहे. अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगेल नाहीत, असं देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत म्हटलं आहे. तसेच आपल्या या भूमिकेवर दोघांची माफी मागतो, असंही फडणवीस जाहीरपणे म्हणाले. पण यावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी कर्णधाराने जाहीर बोलून संभ्रम निर्माण करु नये, असं म्हटलं आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या एका नेत्याने काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येण्याची चर्चा तर सुरू आहेतच. बीएमसी निवडणुकीआधी दोन्ही भाऊ एकमेकांना टाळी देतात का, हे पाहणं पण औत्सुक्याचे ठरेल.या सर्व घडामोडींच्या पाठिमागे पडद्यामागे वेगळं काही घडत तर नाही ना? असा सवाल उपस्थित आहे. काहीही असलं तर राजकीय जाणकारांना यापुढे अधिक डोकं लावून सूत्रांना कामाला लावावं लागणार आहे, हे मात्र नक्की.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *