मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर मुख्य सचिवांच्या खुर्चीवर कोण बसणार, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या नव्या मुख्य सचिवांच्या रेसमध्ये राजेशकुमार, इकबाल चहल, भूषण गंगराणी या सिनियर आयएएस अधिकाऱ्यांचे नाव पुढे आहे. जून 2024 मध्ये सुजाता सौनिक यांच्या रुपात राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळाल्या होत्या. त्या 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी सेवाज्येष्ठतेचे निकष बाजूला सारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली होती. आता मुख्य सचिवपदासाठी देखील मुख्यमंत्री वेगळा विचार करू शकतात, असं बोललं जातं आहे.
या तीन नावांची होतेय चर्चा
सेवा ज्येष्ठतेनुसार महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या नावाची चर्चा आहे. ते 1988 बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांची जर नियुक्ती झाली तर त्याला 3 महिन्याचा कालावधी मिळू शकतो. कारण, ऑगस्ट 2025 मध्ये ते सेवानिवृत्त होतील. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल हेही मुख्य
सचिवपदाच्या स्पर्धेत आहेत. चहल हे १९८९व्या बॅचचे अधिकारी असून ते पुढील वर्षी जानेवारी २०२६मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. याशिवाय १९९० च्या बॅचचे भूषण गगराणी यांचेही नाव चर्चेत आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या आयूक्तपदावर कार्यरत असलेले गगराणी हे मार्च २०२६मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत मुख्य सचिव कोण असावेत याचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. येत्या काही महिन्यात राज्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाला गती देण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्याच्या नावावर मुख्य सचिव म्हणून शिक्कामोर्तब होऊ शकते. मुंबई पोलीस आयुक्त निवडीवेळी फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेचा निकष बाजूला ठेवला होता. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी सुद्धा मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


Leave a Reply