तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या शहराला अधिक महत्व आहे. त्याचे कारण म्हणजे तुळजाभवानीने देवस्थान म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी संपूर्ण एक शक्तीपीठ. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील बस स्थानक हे सर्व सुविधायुक्त असावं म्हणून 8 कोटी रुपये निधी मंजूर करून याचे नुतनीकरण करण्यात आले. 1 मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते या बसस्थानकाचे मोठ्या थाटात उदघाटन झाले. मात्र मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाने या बसस्थानकाच्या निकृष्ठ झालेल्या कामाची पोलखोल केलीय. मोठ्याप्रमाणात झालेल्या पावसात हे बसस्थानक असे गळू लागले की, भाविक म्हणाले हे बसस्थानक आहे की वॉटर पार्क. 8 कोटी रुपये पाण्यात गेले, अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली.
तुळजापूरकरांसह भाविक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. इतकंच नाही तर या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करून, संबंधितांवर कारवाईची मागणी देखील आता जोर धरू लागली आहे. जेंव्हा या बसस्थानकाची घोषणा करण्यात आली त्यावेळी मोठ्याप्रमाणात गाजावाजा करण्यात आला. जणूकाही तुळजापुरात इंटरनॅशनल बसस्थानक बनवलं जाणार, असं चित्र रंगवून स्वप्न दाखवण्यात आले. मात्र सुरुवातीला साडे 3 कोटी रुपयात मंजूर झालेलं काम 8 कोटिपर्यंत गेलं तरी काम बोगस झालंय, अशी टीका होऊ लागली आहे. इंटरनॅशनल तर सोडा पण आम्हाला पहिलं होतं तसं तरी बसस्थानक बनवून द्यायला पाहिजे होतं, अशी भावना आता समोर येऊ लागली आहे.
बोंब मारो आंदोलन
या ‘गळक्या’ कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यनी आज ‘बोंब मारों’ आंदोलन करून आपला आवाज बुलंद केला. एकीकडे बस स्थानक गळतीने ‘बोंबा मारत असताना, कार्यकर्त्यानी त्यात आपल्या ‘बोंबा’ मारून ‘कोरस’ दिला.आता या दुहेरी आवाजाने झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग येणार का, की ते कानात बोळे घालून बसणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Leave a Reply