बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामध्ये त्यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख केला, ज्यामुळे अनेक स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी तरुणांना उद्देशून एक उदाहरण दिले. “कोणतेही काम कमी लेखू नये. पेट्रोल पंपावर काम करूनही धीरूभाई अंबानी यांनी मोठी स्वप्ने साकारली. तशीच तयारी तरुणांमध्ये हवी..! कामातूनच सोने निर्माण करता येते,” असे ते म्हणाले. मात्र, त्यांच्या या वाक्यातील “पेट्रोल सोडून” या शब्दाचा उच्चार “पेट्रोल चोरून” असा ऐकू आल्याने गोंधळ निर्माण झाला आणि हा वाद चिघळला. काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करताना ‘पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले’ असे दाखवले.
अजित पवारांचं स्पष्टीकरण
अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा उद्देश तरुणांना कोणत्याही कामाची लाज न बाळगता मेहनतीने यश मिळवण्याची प्रेरणा देण्याचा होता. त्यांनी हे स्पष्ट केले की, ‘पेट्रोल सोडून’ असे म्हणायचे होते, ‘चोरून’ नाही. त्यांनी असेही म्हटले की, “मला सहकार टीकवायचं नसतं, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? माझी गोरगरिबांची मुलं तिथं लागली ना कामाला. पंपावर काम करणं कमीपणाचं नाही.” अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली. “पंपावर पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, MSCB घोटाळा करून आपण काय केलंत?”, असा सवाल दमानिया यांनी अजित पवारांना विचारला. दमानिया यांच्या या टीकेनंतर हा वाद आणखी वाढला.
राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया:
अंजली दमानिया यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले. “मराठीमध्ये एक म्हण आहे ध चा म करणं तसं इथे स्वयंघोषित समाजसेविकेनं व्यक्तीद्वेषापोटी सोडूनला चोरून केलंय,” असे म्हणत त्यांनी दमानिया यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी केवळ प्रेरणा देण्यासाठी अंबानींचे उदाहरण दिले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय पडसाद
अजित पवारांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या वक्तव्यावरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे, तर सत्ताधारी पक्षातील त्यांचे सहकारी त्यांच्या बचावासाठी पुढे येत आहेत. या प्रकरणामुळे अजित पवारांची पुन्हा एकदा “बोलता बोलता जीभ घसरली” अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांचे धीरूभाई अंबानी यांच्यावरील वक्तव्य हे त्यांच्या नेहमीच्या स्पष्टवक्तेपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘सोडून’ आणि ‘चोरून’ या शब्दांच्या गैरसमजामुळे हा वाद निर्माण झाला असला तरी, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Leave a Reply