मुंबई: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून, विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये १८ आणि १९ जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राला तीव्र पावसाचा अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाचा सविस्तर अंदाज
IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण आणि मध्य भारताचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. आज (१८ जून) पर्यंत संपूर्ण गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश, संपूर्ण छत्तीसगड, झारखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे.पुढील २४ तासांत मुंबईसह उत्तर कोकण किनारपट्टीपासून पूर्वोत्तर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबई आणि ठाण्यात ७० ते १३० मिमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ४० ते ५० किमी प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील ५ दिवसांसाठी जिल्ह्यानुसार अलर्ट
१८ जून:
* ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे व सातारा घाट परिसर.
* यलो अलर्ट: मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
* इतर भाग: उर्वरित भागांत पावसाचा अलर्ट नसला तरी, हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे.
१९ जून:
* ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता.
* यलो अलर्ट: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट.
२० जून:
* यलो अलर्ट: संपूर्ण विदर्भ, हिंगोली, परभणी, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता.
२१ जून:
* यलो अलर्ट: संपूर्ण विदर्भ, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट.
नागरिकांना आवाहन: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि आवश्यकतेनुसार प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply