मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नवीन दीड हजार बस ताफ्यात दाखल केल्या असल्या तरी, यंदाच्या एप्रिल ते जून या महत्त्वाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात सरासरी २० लाख रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तिकीट दरातील वाढ, आगारांची अस्वच्छता आणि वेळेवर बस सेवा उपलब्ध नसणे यांसारख्या कारणांमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या २४ जानेवारी २०२४ रोजी एसटीच्या तिकीट दरात १४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीनंतर एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात एप्रिल महिन्यात केवळ ५.५ टक्के, मे महिन्यात १२.६ टक्के आणि १५ जूनपर्यंत केवळ १२.५ टक्के इतकीच वाढ दिसून आली. ही वाढ अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
तज्ज्ञांचे मत काय?
एसटी महामंडळाचे एकूण ३१ विभाग आणि २५१ आगार आहेत. यापैकी अनेक विभाग सध्या तोट्यात कार्यरत आहेत. विशेषतः ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या विभागांचा समावेश सातत्याने तोट्यात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या तोट्यातील विभागांना फायद्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नफ्यात असलेल्या विभागांचे योगदानही महामंडळाची एकूण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पुरेसे ठरत नाहीये.तोट्यातील आगारांना केवळ ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून उपयोग नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकास, समुपदेशन किंवा कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. या सुधारणांअभावी भाडेवाढीचा अपेक्षित फायदा एसटीला मिळत नसल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि शाळा-कॉलेजला असलेल्या सुट्ट्यांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, यंदा याच गर्दीच्या तीन महिन्यांत प्रवासी संख्येत सरासरी २० लाखांची घट झाली आहे, ही बाब चिंताजनक आहे. लग्नसराई आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमुळेही या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असते. असे असतानाही प्रवासी घटल्याने एसटीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकंदरीत, नवीन बस दाखल होऊनही आणि तिकीट भाडेवाढ करूनही एसटीच्या उत्पन्नात घट झाल्याने महामंडळासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. प्रवाशांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी एसटी प्रशासनाला तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
Leave a Reply