विशाखापट्टणम : आज, २१ जून रोजी देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि विक्रमी सहभागाने साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विशाखापट्टणम येथे ५ लाख योगा साधकांसह भव्य योगसाधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, जो एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. सकाळी ६:३० ते ७:४५ पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचीही उपस्थिती राहणार आहे.
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शुक्रवारी आर. के. बीच येथे कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या योग चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने यंदा ‘योग संगम’ कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यामध्ये देशभरात किमान १ लाख ठिकाणी योग कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु प्रत्यक्षात ११ लाखांहून अधिक संस्थांनी नोंदणी केल्याने हा एक मोठा विक्रम ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ११ वर्षे पूर्ण होत असताना, हा ११ वा योग दिन त्यांच्या उपस्थितीत साजरा होत असल्याने याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, योग दिनाच्या पूर्वसंध्येला आंध्र प्रदेशातील विद्यापीठांमध्ये २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी १०८ मिनिटांत १०८ सूर्यनमस्कार घालून एक नवीन विश्वविक्रम नोंदवला आहे. हा योग दिन खऱ्या अर्थाने ‘योगसंगम’ ठरला आहे, जिथे लाखोंच्या संख्येने नागरिक एकत्र येऊन योगसाधना करत आहेत.


Leave a Reply