इराणकडून भारतासाठी हवाई क्षेत्र खुले, हजारो विद्यार्थी मायदेशी परतणार

तेहरान : इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या संघर्षातही, इराणने माणुसकीच्या नात्याने आपल्या देशात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी आपले हवाई क्षेत्र भारतासाठी खुले केले आहे. भारतासोबतच्या मैत्रीची कदर करत, इराणने युद्धाच्या धामधुमीत घेतलेल्या या मानवतावादी निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी इराणचे आभार मानले आहेत.

सध्या आंतरराष्ट्रीय विमानांना इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी असताना, भारताला यातून अपवाद करण्यात आला आहे. भारत सरकारने या विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था केली असून, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे एक विमान शुक्रवारी रात्रीपर्यंत भारतात पोहोचले आहे, तर आणखी दोन विमाने शनिवारी दुपारपर्यंत भारतात पोहोचणार आहेत. ही उड्डाणे इराणमधील मशहद येथून निघून दिल्लीत उतरतील. केंद्र सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत, १७ जून रोजी भारतीय दूतावासाने ९९० विद्यार्थ्यांना रस्त्याने आर्मेनियाला नेले होते आणि १८ जून रोजी येरेवन येथून विशेष विमानाने हे विद्यार्थी भारतात रवाना झाले.

सध्या सुरू असलेल्या युद्धात इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांना मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलमध्ये २४२ लोक मारले गेले असून ६०० हून अधिक जखमी झाले आहेत, तर इराणमध्ये मृतांची संख्या ६३९ वर पोहोचली असून १३२९ लोक जखमी झाले आहेत. इराणमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार आणखी विमानांची व्यवस्था करेल. तसेच, तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबात शहरातूनही एक विमान भारतीयांना घेऊन दिल्लीला येणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *