अहिल्यानगर: येथील एका शाळेत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या जुन्या वादातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. बुधवारी, एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने शाळेच्या आवारातच दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेने अहिल्यानगर हादरले असून, शाळा आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे.
शाळेत घडली घटना. बुधवारी दुपारी शाळा सुरू होती. मधल्या सुटीत मुले डबा खात होती आणि खेळत होती. त्याच वेळी, आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या पोर्चमध्ये चाकूने हल्ला केला. त्याने विद्यार्थ्याच्या पोटात आणि डोक्यात चाकूने अनेक वार केले, ज्यामुळे तो विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडला. तात्काळ, शाळेतील शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला दुचाकीवरून अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
जुने भांडण ठरले निमित्त
या हत्येचे कारण जुने भांडण असल्याचे समोर आले आहे. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा त्यांच्या सासूच्या घरासमोर क्रिकेट खेळायला जात होता. याच कारणामुळे परिसरातील एक कुटुंब त्यांच्याशी नेहमी भांडण करत होते. त्या कुटुंबातील लोक “तुमच्या मुलाला समजावून सांगा, नाहीतर त्याला जिवंत सोडणार नाही,” अशा धमक्या देत होते. याबाबत मृत विद्यार्थ्याच्या मावशीने २०२४ मध्ये तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये त्या कुटुंबाविरोधात तक्रारही दिली होती. याच जुन्या वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
आरोपी ताब्यात
या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या एका मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर आरोपी शाळेतच थांबला होता आणि त्याचे पालकही तिथे आले होते. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.
हुशार आणि खेळाडू विद्यार्थी
मृत विद्यार्थी अभ्यासात अतिशय हुशार होता, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. तो खेळांमध्येही सक्रिय भाग घेत असे आणि बुद्धिबळही खेळत होता. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि संस्थाचालकही घाबरले आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply