धाराशिव: आत्महत्या प्रकरणात एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच मागून ९५ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने (ACB) धडाकेबाज कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मात्र, या कारवाईदरम्यान एका अनपेक्षित घटनेने सर्वांनाच धक्का बसला.
लाचखोर निरीक्षकाचा फिल्मी स्टाईल पळ
लाच घेताना पकडल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना पुढील कार्यवाहीसाठी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले होते. परंतु, अचानक शेळके यांनी परिस्थितीचा अंदाज घेत कार्यालयातून पळ काढला. यामुळे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ रस्त्यावर हा थरार सुरू झाला. अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्यात मॅरेथॉन धावण्याची स्पर्धाच सुरू झाली. अखेर, अथक पाठलाग करून पोलिसांनी शेळके यांना ‘लेडीज क्लब’जवळ पकडले आणि दुचाकीवरून पुन्हा कार्यालयात आणले. भर चौकात घडलेला हा ‘फिल्मी स्टाईल’ थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात तक्रारदार महिला स्वतः एक पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या मुलावर कारवाई न करण्यासाठी शेळके आणि लोखंडे यांनी लाचेची मागणी केली होती. त्यामुळे, आपल्याच एका सहकारी महिलेमुळे या लाचखोर जोडीचे पितळ उघडे पडले आहे. एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येसारख्या गंभीर आणि दु:खद घटनेतही लाच मागून ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा’ हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक हावेपोटी ही जोडी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकली आणि त्यांच्या हातात बेड्या पडल्या.
या प्रकरणी महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७, ७(अ) आणि पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्याविरोधात कलम १२ नुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे आणि निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांचेही मार्गदर्शन लाभले.


Leave a Reply